मुंबई : भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील महायुती सरकारमध्ये सर्व काही आलबेल आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे. याच कारण शिवसेना नेते आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी भाजप नेत्या सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांना लिहिलेलं पत्र आहे. महायुतीतील मंत्र्यांमध्ये विभागीय कामकाजावरून जुंपल्याचं पाहायला मिळतंय. सामाजिक न्याय विभागातील कामकाजासंदर्भातील बैठका राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी परस्पर घेतल्याच्या आरोपावरुन संजय शिरसाट यांनी एक खरमरीत पत्र लिहिलं आहे.
संजय शिरसाटांची नाराजी आणि खरमरीत पत्र
सामाजिक न्याय विभागातील कामकाजाच्या बैठका राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी परस्पर घेतल्याच्या आरोपावरून याच खात्याचे कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट नाराज झाल्याचं कळतंय. नाराज मंत्री संजय शिरसाट यांनी थेट राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांना पत्र लिहून आपल्या विभागातील बैठक घ्यायची झाल्यास, बैठक माझ्या अध्यक्षतेखाली घ्यावी असे पत्र लिहिलं आहे.
सामाजिक न्याय विभागातील कामकाज मंत्री आणि राज्यमंत्री यांच्याच वाटप झाले असताना आमदारांच्या पत्रावरून मिसाळ यांनी काही बैठका लावत अधिकारी आणि कर्मचारी यांना विविध निर्देश दिले होते, मात्र याबाबत शिरसाट यांना कल्पना नव्हती. या बैठकांची माहिती शिरसाट यांना मिळाल्यानंतर शिरसाट यांनी थेट राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे.
इतकच काय तर पत्रातून यापुढे आपल्याकडील विषयासंबधित आपणास बैठक घ्यावयाची असल्यास सदर बैठक माझ्या अध्यक्षतेखाली आयोजित करणे संयुक्तिक राहीलं असे खरमरीत पत्रच संजय शिरसाट यांनी माधुरी मिसाळ यांना लिहिलं आहे.
सध्या संजय शिरसाट यांच्या या पत्राची जोरदार चर्चा आहे. या पूर्वीही सामाजिक न्याय विभागातून लाडक्या बहिणीसाठी पैसे वळवल्याने शिरसाटांनी नाराजी व्यक्त केली होती. आता शिरसाटांच्या विभागातील बैठकाही राज्यमंत्री घेऊ लागल्याने भाजपकडून सेनेच्या मंत्र्यांना गृहित धरले जात आहे का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या पत्रानंतर सामाजिक न्याय राज्यमत्री माधुरी मिसाळ काय उत्तर देतात हे पाहावं लागेल. महायुतीमधील घटकपक्ष असलेल्या भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस देखील या प्रकरणावर कशा प्रतिक्रिया देतात हे पाहावं लागेल.