Sanjay Shirsat vs Madhuri Misal : सामाजिक न्याय खात्याच्या बैठकीवरून जुंपली, माधुरी मिसाळ यांनी 'त्या' पत्रावर प्रत्युत्तर देताच संजय शिरसाट म्हणाले...
Sanjay Shirsat vs Madhuri Misal : सामाजिक न्याय खात्याचे कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट आणि राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यात बैठकीवरून जुंपल्याचे पाहायला मिळत आहे.

Sanjay Shirsat vs Madhuri Misal : महायुती सरकारमधील शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपमधील मंत्र्यांमध्ये वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. सामाजिक न्याय खात्याचे कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट आणि राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यात बैठकीवरून जुंपली आहे. राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सामाजिक न्याय खात्याच्या काही बैठकांचे आयोजन केल्यानंतर, संजय शिरसाट यांनी नाराजी व्यक्त करत त्यावर लेखी स्वरूपात हरकत नोंदवली. त्याला प्रत्युत्तर देताना माधुरी मिसाळ यांनी देखील पत्राच्या माध्यमातून उत्तर दिलं आहे. त्या म्हणाल्या की, "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसारच मी या बैठकांचे आयोजन केलं आहे. शिवाय, सामाजिक न्याय खात्याच्या राज्यमंत्री म्हणून मला अशा बैठकांसाठी पूर्वपरवानगी घेण्याची गरज नाही," असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. आता यावर संजय शिरसाट यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
संजय शिरसाट म्हणाले की, माझा उद्देश स्पष्ट होता की, राज्यमंत्री, कॅबिनेटमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री अशा पायऱ्यांवरून निर्णय प्रक्रिया व्हावी. त्यांनी त्यांचे मत मांडले आहे. निश्चित मुख्यमंत्री कार्यालयाला प्रत्येक गोष्ट विचारली पाहिजे. त्यांनी विचारले असेल तर माझी त्यात काही हरकत नाही. सारखे सारखे पत्र व्यवहार करणे हे माझ्या स्वभावात नाही. मला ज्या काही सूचना करायच्या होत्या, त्या मी केलेल्या आहेत. त्यांनी काय उत्तर द्यायचे ते दिलेले आहे. त्यामुळे कोणता तरी वाद निर्माण झाला आहे, असे समजण्याचे काही कारण नाही, असे त्यांनी म्हटले.
अचानक पत्र आले ही आश्चर्याची गोष्ट : माधुरी मिसाळ
याबाबत माधुरी मिसाळ यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटले आहे की, माझ्याकडे जे पत्र आले त्याला मी उत्तर दिले आहे. कुठल्याही खात्याचा चांगला कारभार करायचा असेल तर प्रशासनाच्या बैठका घेणे, आढावा घेणे, त्यांना काही सूचना देणे हे माझे कर्तव्य आहे. तो माझ्या जबाबदारीचा भाग आहे. त्यांनी पत्र का दिले? हे तेच सांगू शकता. मी स्वतंत्रपणे बैठका घेऊ शकते, तो माझा अधिकार आहे. त्यांच्या अधिकारात कुठेही ढवळाढवळ न करता मीटिंगमध्ये कुठलेही निर्णय न घेता मी ही मीटिंग घेतली आहे. त्यामुळे मला असं वाटत नाही की, मी त्यांच्या अधिकाराचे कुठेही उल्लंघन केले. त्यांचा काहीतरी गैरसमज झालेला असावा, नाहीतर त्यांनी असे पत्र मला दिले नसते. आमच्या दोघात वाद नाही. आमच्या दोघांमध्ये व्यवस्थित संवाद आहे. पण, अचानक पत्र का आले? ही माझ्यासाठी देखील आश्चर्याची गोष्ट आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
आणखी वाचा

























