Sanjay Raut on Ajit Pawar Death: राज्याचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विमान अपघातावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी (Amol Mitkari) मोठी शंका उपस्थित केलीय. विमान अपघातावेळी 'तिथं धुकं नव्हतं तर धोका होता', त्यामुळं अजित दादांचा 100 टक्के घात झाल्याचे ते म्हणाले. आता यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या प्रकरणावरून गंभीर शंका उपस्थित केली आहे. 

संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना विविध मुद्द्यांवर भाष्य केली. पियुष गोयल यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल झाल्याचा दावा केला. मात्र त्यानंतर काही वेळात त्यांनी आपल्या वक्तव्यावरील यु-टर्न घेतला. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, अजित दादांचा पक्ष हा आता पवार, पाटलांचा पक्ष राहिलेला नाही. तो आता गोयल, पटेल, पारेख, शाह, मोदी यांचा पक्ष होण्याची शक्यता आहे. अजित पवारांचा पक्ष हा अस्सल मराठमोळ्या चेहरांचा पक्ष होता. सुरुवातीला अजितदादांचा पक्ष हा शाहांचा पक्ष होता. आता तो पटेल यांचा पक्ष होईल आणि महाराष्ट्रातील एक प्रादेशिक अस्मिता जपणारा पक्ष भारतीय जनता पक्षाने गिळून टाकला आहे. 

Sanjay Raut on Ajit Pawar Death: अजितदादा स्वगृही परतण्यासाठी धडपड करत होते, पण...

अजित पवार यांनी कधीही भारतीय जनता पक्षाच्या अजेंड्यावर काम केले नाही. सत्तेसाठी ते एकत्र आले. त्यांच्यावर भाजपने काही संकटं लादली. घोटाळ्याचे आरोप झाले, ईडी, सीबीआय मागे लावले. त्यामुळे इतर राजकारणी जसे करतात तसेच त्यांनी केले. तेवढ्यापुरतेच अजितदादा भारतीय जनता पक्षाला सरेंडर झाले. आपल्या वरच्या फाईल क्लिअर करून घेतल्या. त्यानंतर ते पुन्हा एकदा स्वगृही परतण्यासाठी धडपड करत होते. पण दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला, असे संजय राऊत यांनी म्हटले. 

Sanjay Raut on Devendra Fadnavis: ...तर अजितदादांचा फडणवीसांवर विश्वास नसेल

भाजपला विचारल्याशिवाय अजित पवार विलिनीकरणाची चर्चा करतील का? असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत प्रत्येक गोष्टीची चर्चा होतेच, असे नाही. अजित पवार त्यांच्या स्वतःच्या पक्षाचे नेते आणि प्रमुख होते. ते त्यांच्या मर्जीने भाजपसोबत गेले. त्यांना कदाचित वाटले की भाजप हा आपल्या विचारांचा पक्ष नाही. जर अजित पवारांनी फडणवीस यांच्यासोबत चर्चा केली नसेल तर त्यांचा फडणवीसांवर विश्वास नसेल. इतर शंभर लोक म्हणतात ते खोटे आणि फडणवीस म्हणतात ते खरे हे चुकीचे आहे. आज दादा नाहीत. त्यामुळे त्यांच्या नावावर कोणतीही बिले फाडू नयेत, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. 

Sanjay Raut on Ajit Pawar Death: दादांसोबत भाजपच्या भ्रष्टाचाराची फाईल होती का?

अजितदादांचा अपघात आहे की घातपात आहे, असा सवाल उपस्थित होत आहेत. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, हे प्रकरण साधे नाही. अजित पवार मागे फिरले असते तर भारतीय जनता पक्षाची दहशत मोडून गेली असती. अजित पवार वारंवार सांगत होते की, माझ्याकडे भाजपच्या घोटाळ्याची फाईल आहे आणि मी ती उघड करेन. हे त्यांनी 15 जानेवारी रोजी सांगितले आणि पुढील दहा दिवसात त्यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. हे रहस्यमय आहे. मला जस्टीस लोया प्रकरणाची आठवण झाली. अमोल मिटकरी यांनी उपस्थित केलेले प्रश्न गंभीर स्वरूपाचे आहेत. जर विमानातून सहा जण प्रवास करत होते तर पाच मृतदेह कसे काय मिळाले? मग सहावी व्यक्ती कोण होती? त्याची बॉडी का मिळाली नाही? सगळे देह जाळून खाक झाले. त्यांची ओळख पटवता येत नव्हती. मात्र त्याचवेळी अजितदादांच्या जवळ असलेले कागद जळालेले नाहीत. दादांसोबत भाजपच्या भ्रष्टाचाराची फाईल होती का? ते मुंबईतून फाईल बारामतीत सुरक्षित ठेवायला घेऊन चालले होते का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.  

आणखी वाचा 

Ajit Pawar NCP: अजितदादांची राष्ट्रवादी प्रफुल पटेलांच्या हातात जाण्याची चर्चा, अंतर्गत गोटात मोठ्या हालचाली, प्रमुख पदाधिकाऱ्यांचं मोठं पाऊल