Sanjay Raut: अजित पवारांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसची सूत्रे अमित शाहांच्या हातात, प्रफुल पटेल शाह सांगतात तेच बोलतात, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण होणार नाही: संजय राऊत
Sanjay Raut: संजय राऊत यांनी अजित पवार यांचा अपघात झाला त्या विमानाच्या कंपनीबाबत काही शंका उपस्थित केल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अदृश्य शक्ती काम करतेय.

Sanjay Raut on Ajit Pawar plane Crash: अजित पवार यांच्या विमान अपघाताचा पूर्णपणे तपास होणार नाही. अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अमित शाह यांच्या हातात गेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सूत्रे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याही हातात राहिलेली नाहीत, ती अमित शाह (Amit Shah) यांच्या हातात गेली आहेत. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विलीनीकरण होणार नाही. त्याऐवजी अजित पवार (Ajit Pawar) यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच भाजपमध्ये विलीन होईल, असे वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले. ते शनिवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
प्रफुल पटेल ज्याअर्थी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण होऊ नये, असे म्हणत आहेत, त्याअर्थी ही अमित शाह यांची इच्छा आहे. या सगळ्यात भाजपचा अदृश्य हात आहे. सगळं काही अमित शाह यांच्या इच्छेनुसारच होईल. प्रफुल पटेल बोलत आहेत म्हणजे अमित शाहच बोलत आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची सर्व सूत्रे अमित शाह यांच्यात हातात गेली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही ते नियंत्रण उरलेले नाही. भविष्यात अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपमध्येच विलीन होईल, राष्ट्रवादीचे सगळे नेते भाजपमध्ये प्रवेश करतील, असा दावा संजय राऊत यांनी केला.
अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला दहा तोंडे फुटली आहेत. अजित पवार हा एकखांबी तंबू होता. तो कोसळून पडल्यानंतर या तंबूतील उंट, घोडे, बैल यांची धावाधाव सुरु आहे. प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर अजित पवारांच्या संशयास्पद मृत्यूविषयी पवार कुटुंबातून हल्ले होत आहेत. रोहित पवार यांनी पुरावे समोर आणले आहेत. त्यावर प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांनीही पुराव्याच्याआधारेच प्रत्युत्तर द्यावे, असे संजय राऊत यांनी म्हटले.
Ajit Pawar Plane Crash: अजित पवारांच्या अपघाताचा तपास होणार नाही: संजय राऊत
अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाचा तपास होणार नाही, त्यामधून काही निष्कर्ष समोर येणार नाही. रोहित पवार ज्या मुद्द्यांवरुन बोलत आहेत, त्या मुद्द्यांच्या आधारे अजितदादांच्या अपघाताचा तपास सुरु आहे का? अजित पवार ज्या विमानाने प्रवास करत होते, त्या कंपनीत अदृश्य हात आहेत, या कंपनीचा बेनामी मालक कोण? याचा तपास झाला पाहिजे, असे संजय राऊत यांनी म्हटले.
Sanjay Raut on Narhari Zirwal: नरहरी झिरवाळांनी राजीनामा द्यावा: संजय राऊत
नरहरी झिरवाळ यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावरुन राजीनामा द्यावा. नरहरी झिरवळ काय आहेत, हे त्यांच्या तालुक्यातील लोकांनाही माहिती आहे. मंत्रालयातील त्यांचे कार्यालय एसीबीने सील केले आहे. ही लाजीरवाणी गोष्ट आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या परवानगीशिवाय ही कारवाई होऊ शकत नाही. लाचखोरी प्रमाणाच्याबाहेर गेली तेव्हा ही कारवाई झाली. नरहरी झिरवाळ यांचे चारित्र्य सगळ्यांना माहिती आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
आणखी वाचा
देवेंद्र फडणवीस पुन्हा दिल्लीत, एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा राजधानीत, नेमकं काय घडलं?
























