Sanjay Raut: एकनाथ शिंदे हे 'रेम्या डोक्याचे' आहेत, त्यांचा फार अभ्यास नाही, असा व्यक्ती सत्तेत असणे हे राज्यासाठी चिंतेची गोष्ट आहे. एकनाथ शिंदे यांच्या विरोधात सर्वाधिक तक्रारी करणाऱ्यांमध्ये नरेश म्हस्के होते. ठाण्यातून शिंदेंच्या तक्रारींचे नेतृत्व म्हस्के करत होते की महापालिकेत कसा भ्रष्टाचार सुरू आहे, आम्हाला कसे काम करू दिले जात नाही. त्यांच्या या पत्रांचे रेकॉर्ड्स आहेत. आता ते तिथे गेले आहेत कारण प्रत्येकाच्या काही मजबुरी असू शकतात, अशा शब्दात खासदार संजय राऊत यांनी दावा केला. संजय राऊत यांनी दावा केल्यानंतर नरेश म्हस्के यांनी खुलासा केला आहे. नरेश म्हस्के म्हणाले, संजय राऊतांना विचारा, खासदारांना विचारा, त्यांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी जाहीर करण्यासाठी जेव्हा उशीर लागत होता, तेव्हा ते उद्धवजींपासून कशा पद्धतीने शिव्यागाळी करत होते हे अख्ख्या शिवसेनेला माहीत आहे. आम्ही आपला रिस्पेक्ट ठेवतो, त्यामुळे आम्हाला बोलायला लावू नका.
घोटाळ्यांचे आरोप आणि राजीनाम्याचे आव्हान
त्यांनी सांगितले की, नरेश म्हस्के खुली किताब आहे. आम्ही काय तुमच्यासारखे पत्राचाळ आणि हे घोटाळे करणारे लोक नाही आहोत, अडचणी तुमच्या आहेत. एकनाथ शिंदे यांच्या विरोधामध्ये मी पत्रे लिहिली असल्याचा खोटा दावा केला जात आहे. त्यांनी माझं एकतरी पत्र दाखवावं जे मी लिहिलेलं आहे. जर माझं पत्र असेल तर मी राजीनामा देईन आणि जर ते हे सिद्ध करू शकले नाहीत, तर त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहण्याची भूमिका
त्यांनी पुढे सांगितले की, मी एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत होतो आणि कायम राहणार आहे. ज्या दिवशी शिंदे साहेबांनी भूमिका घेतली, त्या दिवशी वरुण सरदेसाईंमार्फत मला 10 ते 15 फोन आले होते आणि मातोश्रीवर दोन मिनिटांसाठी येण्याची विनंती केली होती, पण मी तेव्हाही स्पष्ट सांगितलं की, मी मातोश्रीवर येणार नाही, आम्ही शिंदे साहेबांच्या सोबत आहोत. याच्या 15 दिवस अगोदरही ठाण्यामध्ये 'नेतृत्व तू स्वीकार' असं सांगण्यासाठी मला बोलावलं होतं, तेव्हाही मी सांगितलं की हा विषय माझा नाही, आम्ही शिंदे साहेबांसोबत आहोत. कुठल्याही स्वार्थासाठी नरेश म्हस्के एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत गेलेला नाही, कारण शिंदे साहेबच खऱ्या अर्थाने संघटनेला पुढे घेऊन जाऊ शकतात.
एक कुचकामी मुख्यमंत्री आपण दिलात
पवईच्या हॉटेलमध्ये संजय राऊतांनी काही आमदारांना बैठक घ्यायला लावली होती आणि 'माझं नाव मुख्यमंत्री पदासाठी घ्या' असं सांगून त्यांच्या मागे लागले होते. लोकांनी त्यांना खुश करण्यासाठी बैठक घेतली होती, पण लोक या गोष्टीवर हसत होते की या माणसाला नक्की झालंय काय. संजय राऊत हे तुमचं जे प्रेम आहे ना हे बेगडी प्रेम आहे; तुम्हाला पूर्ण पक्ष हातात घ्यायचा आहे आणि काँग्रेससोबत हा पक्ष घेऊन जायचा आहे, तुम्ही या पक्षाचा सत्यानाश केला आहे. तुम्हीच त्यांच्या डोक्यात घातलं बहुतेक मुख्यमंत्री व्हा आणि महाराष्ट्राला एक कुचकामी मुख्यमंत्री आपण दिलात. काँग्रेससोबत जाण्यास तुम्ही भाग पाडलंत आणि एकसंघ शिवसेनेचं वाटोळं केलंत. शिवसैनिकांचे हे शिव्याशाप तुम्हाला भोगावे लागणार आहेत, असे म्हस्के म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या
