Girish Mahajan and Sanjay Raut: नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त (Republic Day 2026) दिलेल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांचे नाव न घेतल्यामुळे मंत्री आणि भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यावर टीकेची झोड उठत आहे. त्यांच्या भाषणावर आक्षेप नोंदवणाऱ्या वन विभागाच्या कर्मचारी माधवी जाधव आणि दर्शना सौपुरे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात लेखी तक्रार दाखल केली आहे. या दोन्ही कर्मचाऱ्यांनी या प्रकरणात ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणीही केली आहे. तर  वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी माधवी जाधव यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत या प्रकरणात आपला पाठिंबा जाहीर केला आहे. आता या प्रकरणावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.  

Girish Mahajan and Sanjay Raut: नेमकं काय म्हणाले संजय राऊत?

संजय राऊत म्हणाले की, ते कॅबिनेट मंत्री आहेत. त्यांनी दिलगिरी व्यक्त केली असेल तर त्या विषयावर पडदा पडला पाहिजे. 26 जानेवारी या दिवशी भारताला संविधान मिळाले. भारत प्रजासत्ताक झाला, अशा वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावानेच त्या सोहळ्याची सुरुवात व्हायला पाहिजे हे सत्य आहे. त्या महिलेचा देखील सन्मान व्हायला हवा. त्यांनी ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान झाला म्हणून गणवेशामध्ये निषेध व्यक्त केला, मी त्यांचे देखील कौतुक करतो. पण, आता मंत्र्यांनी माफी मागितली आहे. नाक घासलेलं आहे. आता फार विषय ताणू नये, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. 

Girish Mahajan: काय आहे प्रकरण? 

दरम्यान, नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित शासकीय कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्याबाबत वन विभागाच्या कर्मचारी माधवी जाधव यांनी जाहीरपणे आक्षेप नोंदवला. “भाषणादरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव का घेतले नाही?” असा सवाल त्यांनी कार्यक्रमस्थळी उपस्थित करत मंत्री महाजन यांना जाब विचारला. या घटनेमुळे कार्यक्रमात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत माधवी जाधव आणि दर्शना सौपुरे या दोघींना ताब्यात घेऊन सरकारवाडा पोलीस ठाण्यात आणले. या घटनेनंतर या दोघींच्या समर्थनार्थ नागरिकांनी पोलीस ठाण्याबाहेर एकत्र येत मंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. माधवी जाधव आणि दर्शना सौपुरे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात लेखी तक्रार दाखल केली केली आहे. या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटत आहेत.

आणखी वाचा 

Girish Mahajan: मी गावात पंगत देतो, त्यांच्यासोबत जेवायला बसतो, 40 वर्षात अंगात निळा शर्ट घातला नाही असं कधी झालंय का? गिरीश महाजनांच्या नव्या वक्तव्याने वाद आणखी चिघळला