मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) हे सध्या परदेशी दौऱ्यावर आहेत. जॉर्जिया मेलोनी आणि मोदींचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पंतप्रधान मोदी हे काल (मंगळवारी, ता 19) रात्री इटलीत (Italy) दाखल झाले. त्यानंतर त्यांनी इटलीचे राष्ट्राध्यक्ष सर्जिओ माटरेला आणि पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची भेट घेतली. या भेटीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडीयावरती चर्चेत आले आहेत. या फोटोनंतर आणि भेटीनंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले की, प्रधानमंत्री जगभरात फिरत असतात भारताला उपदेश करतात काटकसर करा वगैरे आणि स्वतः जात आहेत. सात देशात नॉर्वे इटली स्वीडन नेदरलँड तुम्ही गेलेला आहात आणि तिकडल्या पत्रकारांनी जर काही प्रश्न विचारले तर पळून कशाला जाता. नॉर्वेचे पत्रकार यांनी भारताचा उल्लेख जगातील सगळ्यात मोठ्या लोकशाहीचे आपण पंतप्रधान आहात आणि तुम्ही प्रश्नांपासून का पळता हा विचारलेला प्रश्न जगभरात गेला आणि मोदी पळताना दिसत आहेत, हे चित्र भारतीय लोकशाहीसाठी आणि भारताच्या प्रतिष्ठेसाठी अत्यंत गंभीर आहे, असंही पुढे संजय राऊतांनी म्हटलं आहे. तर संजय राऊत यांनी मेलोनी आणि मोदी यांच्या भेटीचा आणि सेल्फीचा उल्लेख करत, "ओह माय फ्रेंड मेलोनी" अशा शब्दांत पंतप्रधानांची नक्कल करत कडाडून टीका केली आहे.
Sanjay Raut : आपला भारत 157 क्रमांकावर का गेला?
मोदींनी भारतात गेल्या बारा वर्षात एकही पत्रकार परिषद घेतली नाही. मोदी जगभरात फिरले पण जगात जाऊन देखील कुठलाही पत्रकारांची वार्तालाप केला नाही. लोकांच्या प्रश्नांना तुम्ही उत्तरे देणार नसाल, जगभरातील देशातील लोकशाही अत्यंत संकटात आहे. हे जगाला माहिती आहे, भारतामध्ये मानवी अधिकाऱ्यांच्या उल्लंघन सगळ्या राज्यात होत आहे. गुजरातच्या तुरुंगात किती निरपराध लोक अडकून पडले आहेत, असंही पुढे राऊतांनी म्हटलं आहे. तर आपला भारत 157 क्रमांकावर का गेला? याला जबाबदार नरेंद्र मोदी आहेत. एकेकाळी भारत अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या क्षेत्रात वरच्या स्थानावर होता. फ्रीडम ऑफ प्रेस फ्रीडम्स ऑफ एक्सप्रेशन सर्व काही स्वातंत्र्य सगळ्या बाबतीत बोलण्याचा, लिहिण्याचा, ऐकण्याचा, सभा घेण्याचा अधिकार, आज आम्ही 157 क्रमांकावर जाऊन पोहोचलो हे स्वातंत्र्य आणि मानवी अधिकाराच्या उल्लंघनामुळे असंही पुढे सजंय राऊतांनी म्हटलं आहे.
Sanjay Raut : लोकांना काटकसर करण्याचा उपदेश करतात
संजय राऊत यांनी दावा केला की, पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यादरम्यान नॉर्वेमध्ये एका महिला पत्रकाराने (हेलिंग) त्यांना भारतातील मानवाधिकार उल्लंघनावर प्रश्न विचारला, तेव्हा पंतप्रधान उत्तर न देता तिथून निघून गेले. राऊत म्हणाले की, "पंतप्रधान जगभरात फिरतात, लोकांना काटकसर करण्याचा उपदेश करतात. पण परदेशात गेल्यावर पत्रकारांच्या प्रश्नांना सामोरे न जाता पळून का जातात?"असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
प्रंतधानांनी सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टचा संदर्भ देत संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींची नक्कल (मिमिक्री) केली . ते म्हणाले की, पंतप्रधान इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना 'ओह माय फ्रेंड मेलोनी' (Oh my friend Meloni) म्हणतात. यावर टोला लगावत राऊत म्हणाले, "मेलोनी त्यांची फ्रेंड आहे, पण ती नॉर्वेची पत्रकार (हेलिंग) त्यांची फ्रेंड होऊ शकली नाही. इतकेच काय, या देशातील जनता आणि पत्रकारही त्यांचे मित्र होऊ शकले नाहीत".
पत्रकारांनी विचारले की, जर असा प्रश्न भारतातील एखाद्या पत्रकाराने विचारला असता तर काय झाले असते? यावर राऊत म्हणाले, "जर भारतात एखाद्या पत्रकाराने असे धाडस दाखवले असते, तर त्याला थेट राष्ट्रद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात टाकले असते आणि त्या वृत्तवाहिनी किंवा वृत्तपत्राचे लायसन्स रद्द केले असते". राऊत यांनी पुढे म्हटले की, भारत जागतिक माध्यम स्वातंत्र्य निर्देशांकात (Press Freedom Index) १५७ व्या क्रमांकावर गेला आहे आणि या घसरणीला नरेंद्र मोदींचे सरकारच जबाबदार आहे. गेल्या १२ वर्षांत पंतप्रधानांनी भारतात एकही खुली पत्रकार परिषद घेतलेली नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
तर शरद पवारांच्या वक्तव्यावर संजय राऊत म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यांचे आणि देशाची प्रतिष्ठा जपण्याचे कौतुक केले होते. यावर राऊत यांनी स्पष्ट शब्दांत असहमती दर्शवली. ते म्हणाले की, इंदिरा गांधी, राजीव गांधी, नरसिंह राव आणि मनमोहन सिंग हे माजी पंतप्रधान देखील परदेशात जात होते आणि माध्यमांच्या सर्व प्रश्नांना धैर्याने सामोरे जात होते, ते कधीही प्रश्नांपासून पळत नव्हते.
Sanjay Raut : शरद पवारांच्या वक्तव्यावर राऊत म्हणाले...
संजय राऊत म्हणाले की, आम्ही त्यांच्या वक्तव्याशी सहमत नाही. मोदींनी उत्तर दिलेच पाहिजे. मग इंदिरा गांधी यांच्याशी सहमत आहेत का शरद पवार साहेब? इंदिरा गांधी, मनमोहन सिंग ,नरसिंह राव, मनमोहन सिंग हे माजी पंतप्रधान देखील परदेशात जात होते. तुम्ही स्वतः पासून पळत आहात तुम्हाला काहीतरी लपवायचे आहे आणि ज्यांना लपवायचे आहे तेच पळतात. हा विषय शरद पवार साहेबांचा नाही. हा विषय नरेंद्र मोदींचा आहे. मी नरेंद्र मोदी यांच्या मताशी किंवा भूमिकेशी अजिबात सहमत नाही. कोणत्याही देशाच्या प्रधानमंतत्र्यांनी अशा प्रकारे पळ काढू नये. जो 12 वर्ष देशाचे, नेतृत्व करतो लोकशाहीचा डंका वाजवतो, निवडणुका लढवतो, सत्तेवर येतो, जगभरात फिरत आहे, स्वतःला विश्वागुरू मानत आहे, त्या विषयावर बोलू नये, लोक त्यांना विष्णूचा अवतार मानतात, त्या विष्णू अवताराने भारतीय देवतांची सुद्धा अवहेलना केली, असं म्हणेल. शरद पवार त्यांच्या भूमिका मांडत असतात. कोणती धोरण जाहीर करताना प्रधानमंत्री कोणालाही विश्वासात घेत नाही. किंबहुना त्यांच्या लोकांना ही घेत नसतील. ही माझी माहिती आहे, असंही राऊतांनी म्हटलं आहे.
Sharad Pawar: शरद पवार काय म्हणालेले?
भारताच्या बाहेर देशाची प्रतिष्ठा जपण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) करतात ही गोष्ट आपल्याला विसरुन चालणार नाही. जिथे देशाची प्रतिष्ठा असते तिथं राजकीय आरोप करायचे नसतात असं मत ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी व्यक्त केलं. पुण्यातील लक्ष्मणराव गुट्टे रूरल डेव्हल्पमेंट फाऊंडेशन आयोजित युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजी माजी पदाधिकाऱ्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी शरद पवारांनी पंतप्रधान मोदींच्या कामाचं कौतुक केलं. शरद पवार म्हणाले की, "नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. काही राजकीय विचारांच्या संबंधी माझी आणि त्यांची भूमिका वेगळी असू शकते. पण आज भारताच्या बाहेर देशाची प्रतिष्ठा जपण्याचं काम मोदी करतात ही गोष्ट आपल्याला विसरुन चालणार नाही. जिथे देशाची प्रतिष्ठा येते तिथे राजकीय आरोप करायचे नसतात."
