Sanjay Raut Chandrapur Mahanagarpalika Politics: चंद्रपुरात शेण खाणाऱ्यांवर कारवाई होणार, संजय राऊतांची माहिती; संदीप देशपांडेंना म्हणाले, 20 टक्के कमिशन होतं का?
Sanjay Raut Chandrapur Mahanagarpalika Politics: शिवसेना ठाकरे गटाने भाजपला पाठिंबा दिल्याने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी चंद्रपूरमधील राजकारणावर प्रतिक्रिया दिली आहे.

Sanjay Raut Chandrapur Mahanagarpalika Politics: काही दिवसांपासून चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या चंद्रपूर महानगरपालिकेत ठाकरे गटाने अचानक पाठिंबा दिल्यामुळे भाजपने सत्तास्थापन करत आपला महापौर बसवला. त्यामुळे चंद्रपूर महानगरपालिकेत सर्वाधिक नगरसेवक निवडून आलेल्या काँग्रेस (Congress) पक्षाला मोठा धक्का बसला. भाजपच्या संगीता खांडेकर या चंद्रपूरच्या महापौर झाल्या आहेत. तर ठाकरे गटाचे प्रशांत दानव हे चंद्रपूर महानगरपालिकेचे (Chandrapur Mahangarpalika) उपमहापौर झाले आहेत.
शिवसेना ठाकरे गटाने भाजपला पाठिंबा दिल्याने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी चंद्रपूरमधील राजकारणावर प्रतिक्रिया दिली आहे. चंद्रपूरमध्ये ज्यांनी शेण खाल्लं त्यांच्यावर कारवाई होईल. चंद्रपूरमध्ये जे आमच्या पक्षाने स्थानिक पातळीवर निर्णय घेतला ती आमची भूमिका नाही. त्यांचं आम्ही समर्थन करत नाही. स्थानिक नेत्यांनी त्यांच्या स्वार्थासाठी काही निर्णय घेतले असतील, तर त्यांच्यावर कारवाई होईल, असंही संजय राऊतांनी सांगितले.
चंद्रपूरच्या घटनेचं पक्षातून कुणीही समर्थन केलं नाही- संजय राऊत (Sanjay Raut Chandrapur Mahanagarpalika)
चंद्रपूरच्या घटनेचं पक्षातून कुणीही समर्थन केलं नाही. भारतीय जनता पक्षाबरोबर सत्तेसाठी जाण्याची पक्षाची भूमिका नाही. मुंबईच्या महापौर संदर्भात भूमिका घेतली, जाहीरपणे घेतली. पण चंद्रपूरमध्ये काही भूमिका घेतली असेल तर पक्ष त्याची दखल घेईल, असं संजय राऊतांनी सांगितले. तसेच परभणी महापालिकेमध्ये काँग्रेसने आम्हाला पाठिंबा दिल्याने आभार मानतो, असंही संजय राऊत म्हणाले.
संजय राऊतांचं संदीप देशपांडेंना प्रत्युत्तर- (Sanjay Raut On Sandeep Deshpande)
चंद्रपूर महापालिकेत शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेवकांना एक-एक कोटी देण्यात आलेत. शिवाय त्यांना वेगळ्या ऑफर दिल्याचा दावा, मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केला होता. यावर देखील संजय राऊतांनी संदीप देशपांडे यांचं नाव न घेता प्रत्युत्तर दिलं. ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी 1 कोटी रुपये घेतले, असा आरोप ज्यांनी केला ते भाजपसोबत पैसे मोजायला बसले होते का?, त्यांचं 20 टक्के कमिशन होतं का?, असा सवाल संजय राऊतांनी विचारला आहे.
चंद्रपुरातील पक्षीय बलाबल (Chandrapur Election 2026 Result)
एकूण नगरसेवक 66-
काँग्रेस – 27
काँग्रेस समर्थित जनविकास सेना – 3
भाजप – 23
शिवसेना (उद्धव ठाकरे गट) – 6
वंचित - 2
बसपा - 1
शिवसेना (शिंदे गट) – 1
अपक्ष – 2
एमआयएम – 1

























