नवी दिल्ली : खासदार संजय राऊत आणि खासदार अरविंद सावंत यांनी खासदारांच्या फुटीच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. संजय राऊत यांनी आजच्या पत्रकार परिषदेपूर्वी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यासोबत चर्चा झाल्याची माहिती दिली. याशिवाय बाळासाहेब ठाकरे यांनी यापुढं एखादा खासदार आमदार फुटला तर बेलाशक त्याला रस्त्यात तुडवा,कायदेशीर पर्वा करायची नाही त्याला रस्त्यात तुडवा म्हटल्याची आठवण अरविंद सावंत यांनी सांगितली. तर, संजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या तुडवा या शब्दाचा वापर करत पत्रकार परिषद संपवली. त्यामुळं येत्या काळात शिवसेना खासदार फुटीचा संघर्ष तीव्र होण्याची शक्या आहे.

Continues below advertisement

उद्धव ठाकरेंचा फोन, शरद पवारांची सभा घेण्याची तयारी 

शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते अरविंद सावंत यांनी आजची खासदारांची बैठक व्हीप काढून बोलावली आहे. व्हीप काढला जातो तेव्हा त्याचं गांभीर्य समजून घेतलं पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले. व्हीप हा पक्षाचा आदेश असतो आणि तो पाळावा लागतो. खासदारांसोबत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणं गरजेचं आहे. हा व्हीप प्रत्येकापर्यंत पोहोचलेला आहे, घरी गेलेला आहे, व्हाटसअपवर पाठवला आणि ईमेलवर व्हीप पाठवला आहे, असं संजय राऊत म्हणाले. 

माध्यमातील वातावरण पाहता 9 खासदार असले तरी 15 येतील असं वाटतंय, असा टोला संजय राऊत यांनी लगावला. उद्धव ठाकरे यांचा फोन आला होता, त्यांनी देखील माहिती घेतली, चर्चा केली आणि काही सूचना केल्या, असं राऊत म्हणाले. ही नियमित प्रोसेस असून त्यात नवं काही नाही, असं संजय राऊत म्हणाले. 

Continues below advertisement

संजय राऊत पुढे म्हणाले की, संसदेतील आमच्या पक्षाच्या कार्यालयात 11 वाजता बैठक होणार आहे. तुम्ही ज्यांची नावं घेताय, त्यांना वाटतं एकदा त्यांनी तोडून दाखवलं आता सांगतो तोडून दाखवा,तुम्हाला तोडलं नाही तर शिवसेना बापाचं नाव सांगणार नाही. आमच्या बापाचं नाव बाळासाहेब ठाकरे आहे. लोकशाहीचा खेळ लावलाय का? याला फोडू त्याला फोडू, पैशांची मस्ती आलीय का? ईडी सीबीआयची धमकी कोणाला देताय, आम्ही जेलमध्ये जाऊन आलोय, पुन्हा जेलमध्ये जाण्यास तयार आहे. तुम्हाला धडा शिकवून तुरुंगात जाऊ, देशाची प्रतिष्ठा, नियम, संविधानासोबत तुम्ही खेळ करताय, असा आरोप संजय राऊत यांनी केला.

फुटणाऱ्यांवर लगेचच कारवाईला सुरुवात 

आमच्या पार्टीकडून लोक निवडून आले, आम्ही मेहनत करतो, उद्धव ठाकरे मेहनत करतात, तुम्ही त्यांना किडनॅप करता ही कोणती लोकशाही आहे. नरेंद्र मोदी विदेशात जाऊन मोठ्या बाता करतात त्यांनी देशात काय सुरु आहे ते पाहावं म्हणाले. आज अरविंद सावंत यांनी सर्वांना व्हीप बजावला आहे, लगचेच कारवाई सुरु होणार, असं संजय राऊत यांनी म्हटलं.  

आमदार खासदार एका पक्षावर निवडून येतात, पैशांची प्रलोभन दाखवल्यावर ताबडतोब जो शेजेला जाईल त्याच्या शेजेला जातात, ही प्रवृत्ती वाढत राहिली तर महाराष्ट्राची परंपरा आहे त्याचा गोलपीठा झाला आहे. शिंदे गटाचे लोक गोलपीठातील दलाल आहेत. दलाल निर्माण करण्याचं काम भाजपनं करुन  देशाच्या राजकीय संस्कृतीला काळिमा फासला आहे. 

बाळासाहेबांची शिकवण फुटणाऱ्यांना तुडवा

उद्धव ठाकरेंची चर्चा झाली, शरद पवारांचा फोन झाला, आता जर कोणी बेईमानी करणार असेल तर त्याला सोडायचं नाही. त्यांच्या त्यांचा मतदारसंघात जाऊन राडे करायचे. पवार साहेब तुमच्याबरोबर त्या भागात सभा घेण्यासाठी येतो म्हणाले. कोणीही कुठल्याही पक्षाचा खासदार फुटला तर त्याला आता मोकळीक द्यायची नाही, त्याला धडा शिकवायचा, त्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार आणि काँग्रेस पक्षसुद्धा असेल. बाळासाहेबांची शिकवण तुडवा असल्याचं म्हणत संजय राऊतांनी पत्रकार परिषदेचा शेवट केला.  

वंदनीय शिवसेना प्रमुखांनी जाहीरपणे सांगितलं होतं, यापुढं एखादा खासदार आमदार फुटला तर बेलाशक त्याला रस्त्यात तुडवा,कायदेशीर पर्वा करायची नाही त्याला रस्त्यात तुडवा, हा बाळसाहेबांचा विचार आहे त्याची आठवण करुन देतो, असं अरविंद सावंत म्हणाले.

Shivsena MPs: कोणते खासदार शिंदे गटाच्या वाटेवर?

1. संजय जाधव

2. संजय देशमुख

3. नागेश पाटील आष्टीकर

4. ओमराजे निंबाळकर

5. भाऊसाहेब वाकचौरे

6. संजय दिना पाटील

ठाकरेंसोबत कोणते खासदार? 

अरविंद सावंत, अनिल देसाई, राजाभाऊ वाझे