Sanjay Raut: नाशिक शहरातील प्रस्तावित 66 किलोमीटरच्या रिंग रोडसाठी सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेने आता राजकीय वळण घेतले आहे. मातोरी आणि मुंगसरे येथे मोजणीदरम्यान शेतकरी महिलांना झालेल्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ शिवसेना (ठाकरे गट) नेते खासदार संजय राऊत यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. राऊत यांनी थेट प्रांताधिकारी पवन दत्ता यांना फोन लावून जाब विचारला असून, पोलीस अधीक्षक डी. एस. स्वामी यांच्याकडेही तक्रार नोंदवली आहे.
संजय राऊत आज नाशिक दौऱ्यावर आले असून रिंग रोडला विरोध करणाऱ्या बाधित शेतकरी महिलांनी त्यांची भेट घेऊन आपली आपबिती सांगितली. यावेळी राऊत यांनी तातडीने प्रांताधिकारी पवन दत्ता यांना फोन लावला. "तुम्हाला कोणी दिला? तुमच्या घरी आई-बहिणी असतील ना? हा कोणता नियम आहे? माझ्याकडे मारहाणीचे व्हिडिओ आहेत, हे बरोबर नाही," अशा शब्दांत राऊतांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. तसेच पवन दत्ता नावाचा प्रांत अधिकारी हा पर प्रांतीय आहे. त्याला इथे कोणी आणले? गिरीश महाजन यांचा तो कलेक्टर आहे, असा आरोप देखील त्यांनी केलाय.
Nashik News: नेमकं प्रकरण काय?
नाशिक रिंग रोडच्या मोजणीसाठी काही दिवसांपूर्वी महसूल आणि पोलीस प्रशासन मातोरी परिसरात गेले होते. यावेळी काही शेतकरी कुटुंबांनी आपल्या जमिनी देण्यास विरोध दर्शवला. स्थानिक ग्रामस्थांचा आरोप आहे की, प्रांताधिकारी पवन दत्ता यांच्या उपस्थितीत पोलिसांनी शेतकऱ्यांच्या घरात शिरून महिलांना मारहाण केली आणि त्यांना फरफटत बाहेर काढले. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संतापाची लाट उसळली आहे.
Sanjay Raurt: आंदोलनाचा इशारा
दरम्यान, सध्या शिवसैनिक आणि बाधित ग्रामस्थ जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले आहेत. पवन दत्ता यांची भेट घेऊन जाब विचारला जाणार असून, थोड्याच वेळात संजय राऊत स्वतः जिल्हाधिकारी कार्यालयात जाणार आहेत. शिवसेनेने आंदोलन केले आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याला प्रशासनच जबाबदार असेल," असा इशारा राऊत यांनी दिला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
