Sanjay Gaikwad Shivaji Kon Hota: कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित 'शिवाजी कोण होता' या प्रसिद्ध पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोनवरून धमकावल्याप्रकरणी आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी शिंदे गटाचे (Shivsena)  आमदार संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. प्रकरणात न्यायालयाने आमदार संजय गायकवाड यांच्या पोलीस चौकशीला (Police Inquiry) परवानगी दिली असून, हा गायकवाड यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. या निर्णयानंतर प्रशांत आंबी यांनी पोलीस प्रशासन, गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत. "या प्रकरणावर गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांचाच दबाव आहे. त्यांचा दबाव नसता, तर आतापर्यंत संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल होऊन कारवाई झाली असती," असा थेट आरोप प्रशांत आंबी यांनी केला आहे.

Continues below advertisement

प्रशांत आंबी म्हणाले की, आमदार संजय गायकवाड यांनी सांगितले की, हा आवाज माझाच आहे. धमकीचा फोन त्यांचाच होता. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे ही मागणी आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांचे अजूनही मला फोन येत आहेत. आई-बहिणीवरून फोन करून शिव्या देत आहेत. आम्ही त्यांच्या धमक्यांना भीक घालत नाही. मात्र,आता पोलीस या प्रकरणात गंभीर होणार आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.  

Prashant Ambi: नाहीतर आतापर्यंत संजय गायकवाडांवर कारवाई झाली असती

याआधी आम्ही काही तक्रार दिली नव्हती. काही तरुण हे स्पर्धा परीक्षा देणारे होते. मात्र, आता त्यांचे धाडस वाढत आहे. मला चार दिवसापूर्वी देखील धमकीचा फोन आला. दोन ते तीन हजार कॉल मला पेंडिंग आहे. उद्या लेखी अर्ज मी कोल्हापूर पोलिसांना देणार आहे. आठ ते दहा दिवसांपापूर्वी आम्ही कोर्टाची लढाई लढण्यासाठी तयारी केली आहे. पानसरेंना न्याय मिळाला की नाही हे संपूर्ण महाराष्ट्र बघतोय. मात्र आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. आमचा पोलिसांवर अजिबात विश्वास नाही. पोलीस जे पुरावे कोर्टासमोर आणतील. त्यावरच कोर्ट निर्णय देईल. आम्ही दूधखुळे नाही तर चळवळीतले कार्यकर्ते आहोत. गृहमंत्री, मुख्यमंत्री यांचाच या प्रकरणावर दबाव आहे. त्यांचा दबाव नसता तर आतापर्यंत संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल झाला असता. त्यांच्यावर कारवाई झाली असती. आम्ही मुख्यमंत्र्यांकडे दाद मागणार नाही. मात्र, रस्त्यावरची लढाई आम्ही लढणार आहोत, असा इशारा प्रशांत आंबी यांनी दिला आहे. 

Continues below advertisement

Sanjay Gaikwad Shivaji Kon Hota: संजय गायकवाड यांची प्रतिक्रिया

दरम्यान, या प्रकरणावर आता संजय गायकवाड यांची देखील प्रतिक्रिया समोर आली आहे. छत्रपतींचा एकेरी उल्लेख केल्याबद्दल जी काही मी शिवीगाळ केली होती, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त केली आहे. यापुढेही शिवरायांचा अपमान करणाऱ्याचा विषय असेल तर मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे. आगामी विधानसभा अधिवेशनात  'दगलबाज', 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकांवर बंदी आणण्याकरता मी मुख्यमंत्री साहेबांना आग्रही असणार आहे. याविषयी माननीय न्यायालयाने जे काही आदेश दिले असतील, पोलिसांना सहकार्य करण्यास मी तयार आहे, असे संजय गायकवाड यांनी म्हटले आहे. 

Sanjay Gaikwad Shivaji Kon Hota: नेमकं प्रकरण काय? 

काही दिवसांपूर्वी आमदार संजय गायकवाड यांना गोविंद पानसरे यांनी तब्बल 37 वर्षांपूर्वी लिहिलेल्या शिवाजी कोण होता? या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख असल्याचा मुद्दा आक्षेपार्ह वाटला होता. त्यानंतर संजय गायकवाड यांनी प्रशांत आंबी यांना फोन करून शिवीगाळ केल्याचा आरोप झाला. तसेच, हे पुस्तक पुन्हा छापल्यास गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, अशी धमकी दिल्याचेही समोर आले होते.

या फोन संभाषणाची कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. संभाषणादरम्यान संजय गायकवाड यांनी दिवंगत गोविंद पानसरे यांच्याविषयीही आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा आरोप करण्यात आला. याविरोधात प्रशांत आंबी यांनी ठाम भूमिका घेत संजय गायकवाड यांना प्रतिआव्हान दिले होते. तसेच, त्यांनी बुलढाण्यात संजय गायकवाड यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्याचाही प्रयत्न केला होता. मात्र, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते.

दरम्यान, आता कोल्हापूर सत्र न्यायालय यांनी आमदार संजय गायकवाड यांच्या चौकशीला परवानगी दिल्याने हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. लोकप्रतिनिधीची चौकशी करण्यासाठी पोलिसांना न्यायालयाची परवानगी आवश्यक असते. त्यानुसार, राजारामपुरी पोलिसांनी न्यायालयाकडून आवश्यक परवानगी घेतली असून, आता संजय गायकवाड यांच्या चौकशीचा मार्ग मोकळा झाला आहे.

आणखी वाचा 

हिंदू हा धर्म नाही, भारतात हिंदू धर्माला मान्यता नाही, जनगणनेत धर्माच्या कॉलममध्ये फक्त लिंगायत धर्म लिंगायत बांधवांनी नमूद करावे : जनबसवनंद स्वामीजी