Sanjay Gaikwad: मारहाणीला 35 तास उलटूनही पोलीस शांत, मारकुटे आमदार संजय गायकवाड म्हणतात, ती छोटीशी मारहाण, फक्त एनसी मॅटर!
Sanjay Gaikwad : आमदार निवासातील कँटिनमध्ये निकृष्ट दर्जाचे जेवण दिल्यावरुन आमदार संजय गायकवाड यांनी कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केली होती.

Sanjay Gaikwad : आमदार निवासातील कँटिनमध्ये निकृष्ट दर्जाचे जेवण दिल्यावरुन बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केली. मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याचे पडसाद पावसाळी अधिवेशनातही (Monsoon Session 2025) उमटले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी यावर प्रतिक्रिया देताना लोकप्रतिनिधीने मारहाण करणे चुकीचे असल्याचे म्हटलं. तर आपण जे काही केलं त्यावर ठाम आहोत, अशी भूमिका संजय गायकवाड यांनी घेतली आहे. आता या प्रकरणाला 35 तास उलटून गेल्यानंतर देखील संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल झालेला नाही. तर दुसरीकडे अन्न व औषध प्रशासनाने आमदार निवासातील कॅन्टीन मोठी कारवाई केली आहे.
आमदार निवासातील कँटिनमध्ये निकृष्ट जेवण दिल्यानं आमदार संजय गायकवाड यांनी कँटिनमधील कर्मचाऱ्याला मारहाण केल्यानंतर कँटिन चालवणाऱ्या अजंता केटरर्सचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. आमदार संजय गायकवाड यांनी मारहाण केल्यानंतर कँटिनमध्ये अन्न आणि औषध प्रशासनाचे पथक दाखल झाले होते. यानंतर अधिकाऱ्यांनी आकाशवाणी आमदार निवासच्या कँटिनची संपूर्ण तपासणी करण्यात आली. खाद्यपदार्थ, तेलाच्या बाटल्या यांचे नमुने गोळा करण्यात आले. हे नमुने फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात आले असून याबाबत अहवालसुद्धा पाठवला जाणार आहे.
...तर माझी रिअॅक्शन चुकीची नव्हती
आता या प्रकरणावर आमदार संजय गायकवाड यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटले आहे की, वेटरला मारले असं म्हणण्यात आले. मात्र तो वेटर नव्हता तर तो मॅनेजर होता. काल दुपारी त्याला मालकाने सस्पेंड देखील केले आहे. जवळपास 200 ते 400 तक्रारी चार-पाच वर्षात केल्यानंतर देखील एफडीएने कारवाई केलेली नाही. काल नरहरी झिरवाळ यांनी सांगितले की, मी त्यांना कारवाई करायला सांगितली. परंतु दोन-दोन महिने मला अहवाल येत नाही म्हणजे यात कोणाचे साटेलोटे होते. आज हा मनुष्य लाखो लोकांच्या आरोग्याशी खेळत होता. मला स्वतःला पोटाचा आजार आहे. मी वीस वर्षापासून पोटाच्या आजाराने त्रस्त आहे. मी जराही वेड वाकडं खाल्लं तरी मला पोटाचा त्रास होतो. त्यामुळे मी कधी बाहेर देखील जेवत नाही. म्हणून मला जर इतके विषारी जेवण ते देणार असतील आणि मला जर काही त्रास होणार असेल तर माझी रिअॅक्शन चुकीची नव्हती. इतका मात्र खरं आहे की, अनेक वेळा तक्रारी करून देखील यांनी काही कारवाई केलेली नाही. मला माहित होतं की, माझा मार्ग चुकीचा आहे. येणाऱ्या काळात लाखो महाराष्ट्रातील नागरिकांचं आरोग्य यामुळे वाचणार आहे, असे ते म्हणाले.
साऊथ इंडियन लोकांचा इतका पुळका का?
विरोधक माझ्यावर टीका करतायेत. पण, मला त्यांना विचारायचे आहे की, हे साऊथ चे लोक आहेत. या लोकांनी तुमचा महाराष्ट्र नासवला. सगळ्या लेडीज बारमध्ये महाराष्ट्राची तरुणाई बरबाद केली. महाराष्ट्राचं कल्चर खराब केलं. आज तुम्हाला त्यांचा इतका पुळका का येतोय? मी जे केलं ते महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांकरिता केले. मग तुम्हाला साऊथ इंडियन लोकांचा इतका पुळका येण्याची गरज काय? असा सवाल संजय गायकवाड यांनी यावेळी उपस्थित केला.
ती छोटीशी मारहाण
संजय गायकवाड पुढे म्हणाले की, ती छोटीशी मारहाण आहे. मला सगळे कायदे माहित आहेत. हे फक्त एनसी मॅटर आहे. यामध्ये कुठेही तर शिक्षेची तरतूद कायद्यानुसार बहुतेक नाही. इतकं खरं आहे की, हे विधान भवनाच्या आत येत असल्याने मी अध्यक्षांना देखील भेटलो. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना देखील मी माझी बाजू सांगणार आहे. त्यांच्या दृष्टीने माझी चूक असेल तर माझ्यावर जी कारवाई होईल, त्याला सामोरे जायला मी तयार आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
आणखी वाचा

























