Sanjay Gaikwad : संजय गायकवाडांविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली? मारहाण झालेल्या कँटिन कर्मचाऱ्याला पोलीस भेटले, विचारपूस केली पण...
Sanjay Gaikwad : बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासातील कँटिनमध्ये मिळालेल्या निकृष्ट जेवणावरून कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केली होती.

Sanjay Gaikwad : बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी आमदार निवासातील कँटिनमध्ये मिळालेल्या निकृष्ट जेवणावरून कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रकरणाची जोरदार दखल पावसाळी अधिवेशनातही (Monsoon Session 2025) घेण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी लोकप्रतिनिधीने मारहाण करणे हे चुकीचे असल्याचे सांगितले, तर संजय गायकवाड यांनी आपण केलेल्या कृत्यावर ठाम असल्याची भूमिका घेतली. मात्र, या घटनेला 40 तास उलटून गेले तरीही गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल झालेला नाही. संजय गायकवाड यांच्यावर अद्याप गुन्हा का दाखल झाला नाही? याबाबत विविध चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. आता या प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे.
कँटिन कर्मचाऱ्याला पोलीस भेटले, विचारपूस केली पण...
आकाशवाणी कँटिनमध्ये मिळालेल्या निकृष्ट जेवणामुळे संतप्त झालेल्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी कँटिनच्या कर्मचाऱ्यावर हात उगारला होता. या प्रकारानंतर मरीन ड्राइव्ह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कर्मचाऱ्याची चौकशी केली होती. मात्र, अद्याप संजय गायकवाड यांच्या विरोधात कोणतीही अधिकृत तक्रार दाखल न झाल्यामुळे पोलिसांनी गुन्हा नोंदवलेला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
काय म्हणाले संजय गायकवाड?
या प्रकरणावर संजय गायकवाड यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटले होते की, मी ज्याला मारहाण केली तो वेटर नव्हता तर कँटिनचा व्यवस्थापक होता. कँटिनच्या मालकाने त्याला सस्पेंड केले आहे. या कँटिनविरोधात गेल्या पाच वर्षांत 400 तक्रारी आल्या, पण कोणतीही कारवाई झाली नाही. नरहरी झिरवाळ यांनी सांगितलं की, मी कारवाई करायला सांगितली, पण दोन महिने झाले मलाच अहवाल येत नाही. या सगळ्यात कोणाचं साटेलोटं होतं? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
कँटिनमध्ये लोक पाच-दहा हजार लोक जेवतात, त्यांच्या आरोग्याशी खेळ सुरु होता. मला गेली 20 वर्षे पोटाचा त्रास आहे. मी वेडवाकडं खाल्लं, तर 15 दिवस त्रास होतो. त्यामुळे मी बाहेर जेवत नाही. कँटिनमध्ये विषारी जेवण देत असतील तर मला परत त्रास होतो. त्यामुळे माझी प्रतिक्रिया चूक नाही. माझा मार्ग चुकीचा होता, पण मला हे करावं लागलं. त्यामुळे एफडीएला कारवाई करावी लागली. माझ्या कृतीमुळे लाखो लोकांचे आरोग्य वाचणार आहे, असे संजय गायकवाड यांनी म्हटले. तसेच, मी केलं ते छोटीशी मारहाण होती. मला कायदे माहिती आहेत, हा एनसी मॅटर आहे. त्यासाठी कायद्यानुसार शिक्षेची तरतूद नाही, असा दावा देखील संजय शिरसाट यांनी केला.
आणखी वाचा


















