वडील 14 वर्ष मंत्री, 6 वेळा आमदार अन् स्वत:ही 3 वेळेस आमदारकी मिळवली, आता काँग्रेस सोडून भाजपात जाणार, कोण आहेत संग्राम थोपटे?
Sangram Anantrao Thopate : काँग्रेस नेते संग्राम थोपटे यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून ते आता भाजपमध्ये जाणार आहेत.

Sangram Anantrao Thopate : काँग्रेसला (Congress) गेल्या काही वर्षांत अनेक राजकीय घराणे सोडून गेले. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील अशा असंख्य नेत्यांनी काँग्रेसमध्ये मोठी पद भोगूनही भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता यामध्ये आणखी एका नेत्याची भर पडताना दिसत आहे. भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे (Sangram Anantrao Thopate) यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून ते आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
संग्राम थोपटे हे तीन वेळेस आमदार राहिले आहेत. त्यांना मंत्रिपदाची अपेक्षा होती. मात्र, महाविकास आघाडीकडून ती पूर्ण झाली नाही. संग्राम थोपटे हे अनंतराव थोपटे यांचे चिरंजीव आहेत. अनंतराव थोपटे यांनी काँग्रेसकडून 14 वर्ष मंत्रिपद भूषवलं होतं. अनंतराव थोपटे हे भोर विधानसभा मतदारसंघाचे 6 वेळेस आमदार झाले होते. त्यांनी राज्याच्या मंत्रिमंडळात 14 वर्षे मंत्री म्हणून काम केलं होतं., ज्यामध्ये त्यांनी विविध खात्यांचे कार्यभार सांभाळले . त्यांचे पुत्र, संग्राम थोपटे, हे देखील भोर मतदारसंघातून तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी वडिलांच्या राजकीय वारशाचा प्रभावीपणे पुढे चालवला असल्याचे बोलले जाते.
थोपटे घराण्याने भोर तालुक्यात 40 वर्षांपेक्षा जास्त काळ सत्ता उपभोगली आहे. अनेक राजकीय विश्लेषक भोर म्हणजे थोपटे आणि थोपटे म्हणजे भोर असंही म्हणायचे. मात्र, 2024 च्या विधानसभा निवडणुकीत थोपटे घराण्याला सर्वात मोठा हादरा बसलाय. संग्राम थोपटे यांना विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागलाय. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते शंकर मांडेकर यांनी संग्राम थोपटे यांचा पराभव केलाय. या निवडणुकीत शंकर मांडेकर यांनी 126,455 मतं मिळवली तर संग्राम थोपटेंना 106,817 मतांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे शंकर मांडेकर यांनी थोपटे घराण्याची 40 वर्षांची सत्ता उलथून लावलीये. मात्र, पराभव होताच संग्राम थोपटेंनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतलाय.
दरम्यान, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत संग्राम थोपटे यांनी सुप्रिया सुळेंचा जोरदार प्रचार केला होता. शरद पवारांनी सुप्रिया सुळे यांना निवडून आणण्यासाठी संग्राम थोपटे यांचे वडिल अनंतराव थोपटे यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या.
इतर महत्त्वाच्या बातम्या


















