Sachin Kharat on Abhijeet Dipke: कॉकरोच जनता पार्टीतर्फे शिवाजी पार्क (Shivaji Park) येथे आयोजित आंदोलनादरम्यान अभिजीत दिपके (Abhijeet Dipke) यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून नवीन वादाला तोंड फुटले आहे. दिपके यांनी नेहरू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या विधानाचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सचिन खरात गट) चे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात (Sachin Kharat) यांनी तीव्र शब्दांत समाचार घेतला आहे. दिपके यांनी आपल्या वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागावी, अन्यथा आंबेडकरी जनता त्यांच्या तोंडाला काळे फासेल, असा इशारा सचिन खरात यांनी दिला आहे.

Continues below advertisement

Sachin Kharat on Abhijeet Dipke: सचिन खरात यांचा अभिजीत दिपकेंवर जोरदार हल्लाबोल

सचिन खरात यांनी अभिजीत दिपके यांच्या वक्तव्याचा कडक शब्दांत निषेध नोंदवला. खरात म्हणाले, "दिपके म्हणाला नेहरूंनी आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मतदानाचा अधिकार दिला, हे वक्तव्य अत्यंत चुकीचे आहे. फक्त डॉ. बाबासाहेबांनीच या देशातील नागरिकांना मतदानाचा अधिकार आणि राज्यघटना दिली, त्यामुळे चुकीच्या वक्तव्याबद्दल अभिजीत दिपकेने जाहीर माफी मागावी, अन्यथा आंबेडकरी जनता तोंडाला काळे फासेल. अभिजीत दिपके याने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना काँग्रेसमय करण्याचा प्रयत्न करू नये."

पुढे बोलताना खरात म्हणाले, "दिपके तू म्हणाला गांधी सोल आहेत, नेहरू माईंड आहेत आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर या देशाचे बॅकबोन आहेत. मी तुला सांगतो, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर या देशाचे फेस ऑफ इंडिया आहेत आणि यापुढे जाऊन सांगतो, बाबासाहेब आंबेडकर या देशाचे होल अँड सोल आहेत. नेहरूंनी भंडारा लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधामध्ये प्रचार केला होता. तसेच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित समाजाच्या व्यथा मांडण्यासाठी सायमन कमिशनला भेट द्यायला गेल्यानंतर काँग्रेसने बाबासाहेबांना देशद्रोही म्हटलं होतं," असे म्हणत त्यांनी अभिजीत दिपके यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय.

Continues below advertisement

Abhijeet Dipke: नेमकं काय म्हणाले होते अभिजीत दिपके?

अभिजीत दिपके म्हणाले होते, "आज महात्मा गांधी यांची जयंती आहे. आपण आपल्या अधिकाऱ्यांसाठी लढत आहोत, यापेक्षा गांधींना मोठी श्रद्धांजली नाही. इंग्रजांनी जेवढा गांधींना त्रास दिला नाही, तेवढा त्रास हे संघाचे लोक आपल्याला देत आहेत. त्यांना वाटत होतं की गांधींना गोळी घालून ते गांधींचा विचार संपवून टाकतील. पण, गांधी कधी मरत नाहीत. गांधी हे देशाचा आत्मा आहेत. जोपर्यंत आमच्यासारखे युवक आहेत, तोपर्यंत देशांमध्ये गांधी जिवंत आहेत. नथुराम गोडसेसारखे हजारो आले तरी गांधींचा विचार संपणार नाही. याचबरोबर भारतातील लोकशाहीला अडचणीत आणणाऱ्या ज्ञानेश कुमार यांनी मुख्य निवडणूक आयुक्त पदाचा राजीनामा द्यावा, त्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही. आपल्या देशातील लोकांना मतदानाचा अधिकार माहिती नव्हता. त्यावेळेस नेहरू आणि आंबेडकरांनी अधिकार दिला. जर गांधीजी या देशाचा आत्मा असतील तर आंबेडकर हे या देशाचा कणा आहेत आणि पंडित नेहरू या देशाचे मन आहेत," असे त्यांनी म्हटले होते. 

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा

CJP Mumbai Protest : सीजेपीच्या आंदोलनात 'जय श्री रामा'च्या घोषणा, शिवाजी पार्क परिसरात गोंधळ, पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर अनुचित प्रकार टळला