Rupali Chakankar on Rohini Khadse : हनीट्रॅप प्रकरणावरून एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातील वाद सुरू असतानाच आता पुण्यातील एका पार्टीवरून आणखी एक वादंग उभं राहिलं आहे. काल (२७ जुलै) पुण्यातील एका रेव्ह पार्टीवर (Pune Rave Party) पोलिसांनी धाड टाकली. ही पार्टी खराडी येथील एका हॉटेलमध्ये सुरु होती. या कारवाईदरम्यान एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचे जावई आणि रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांचे पती प्रांजल खेवलकर (Pranjal Khewalkar) यांना पोलिसांनी अटक केली. या घडामोडींनंतर रोहिणी खडसे यांनी ‘एक्स’वर आपली प्रतिक्रिया दिली. "मला कायद्यावर आणि पोलीस यंत्रणेवर पूर्ण विश्वास आहे. प्रत्येक गोष्टीला वेळ हेच उत्तर असतं. योग्य वेळी सत्य समोर येईल," असं रोहिणी खडसे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. आता यावरून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी रोहिणी खडसे यांना डिवचले आहे.
रुपाली चाकणकर यांनी कोल्हापूर येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना पुण्यातील रेव्ह पार्टीबाबत विचारले असता त्या म्हणाल्या की, उभ्या महाराष्ट्राने पाहिला आहे. या रेव्ह पार्टीमध्ये ज्या पद्धतीने ड्रग्स, गांजा आणि ज्या पद्धतीची ही पार्टी होती, उद्याच्या समाजाचं भवितव्य ज्या तरुणाच्या हातात आहे, त्या तरुणाईला नशेत घेऊन जाणाऱ्या या पार्ट्या आहेत. समाजाला कीड लावण्याचा काम या माध्यमातून होत असते. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने ड्रग्ज विरोधातील मोहीम फार प्रखर केली आहे. मला विश्वास आहे की, पोलीस यावर कठोर कारवाई करतील. पण अशा पद्धतीच्या चुकीच्या घटना घडत आहेत आणि त्या राजकीय घरातून घडत आहेत. पोलीस कारवाई करतीलच पण यात पक्षाचे लोक आहेत आणि ज्यांच्या माध्यमातून हे केलं जात आहे. त्यांच्यावरही कुठेतरी लगाम बसला पाहिजे, असे त्यांनी म्हटले.
दूध का दूध पाणी का पाणी, कायद्याचे चौकटीतून होईलच
विरोधकांकडून हा ट्रॅप असल्याचा आरोप केला जात आहे. याबाबत विचारले असता, रूपाली चाकणकर म्हणाल्या की, राज्य महिला आयोगाची अध्यक्ष म्हणून माझा संविधानावर, घटनेवर आणि कायद्यावर विश्वास आहे. कालपासून पोलीस तपास करत असताना स्वतः पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन घडलेल्या घटना मांडलेल्या आहेत. पोलिसांना तपास करण्यासाठी काही अवधी देणे गरजेचे आहे. यामधील काही मेडिकल रिपोर्ट समोर येतील, ते सुद्धा पोलीस आपल्यासमोर मांडतील. त्यामुळे दूध का दूध पाणी का पाणी, हे कायद्याचे चौकटीतून होईलच, असे म्हणत त्यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले.
स्वतःवर प्रसंग ओढवला तर वेळ कळते का?
रोहिणी खडसे यांच्या ट्विटबाबत विचारले असता रूपाली चाकणकर म्हणाल्या की, महाराष्ट्र पाहतोय की, कुठल्या गोष्टीची त्या पाठराखण करत आहेत. स्वतःवर वेळ आल्यानंतर समजते की या गोष्टी काय असतात. फुके यांच्या प्रकरणात मी स्वतः पोलीस आयुक्तांच्या संपर्कात होते. मी स्वतः अहवाल मागून घेतला होता. कुठल्याही घटनेची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलीस त्याचा तपास करतात. हा तपास चार्जशीटच्या माध्यमातून कोर्टात दाखल केला जातो आणि कोर्टाच्या माध्यमातून निकाल दिला जातो, ही साधी प्रक्रिया आहे. पण न्यायप्रविष्ट ही शब्दरचनाच या महिलांना समजत नाही. याबाबत मला त्यांच्या ज्ञानावर शंका वाटते. न्यायप्रविष्ट असलेल्या केसमधील पीडित महिलांना घेऊन त्यांनी अनेक वेळा पत्रकार परिषद घेतल्या. पीडित महिलांचा भांडवल त्यांनी स्वतःच्या राजकारणासाठी केले हे दुर्दैव आहे. आज स्वतःवर वेळ आल्यानंतर वेळेचा बघू, कायद्याचा बघू म्हणताय, असे म्हणत त्यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर निशाणा साधला.
आणखी वाचा
Pahalgam attack: पहलगाम हल्ल्याचा बदला, ऑपरेशन महादेवला यश, पर्यटकांना मारणारे 2 दहशतवादी ठार!
