नाशिक : राज्यात गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या भोंदूबाबा अशोक खरातच्या (Ashok kharat) व्हिडिओवरुन सर्वत्र खळबळ उडाली असून आरोपीचे अनेक दिग्गजांसह फोटो व्हायरल झाले आहेत. विशेष म्हणजे, महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर ह्या अशोक खरातच्या संस्थेवर सदस्य असून त्यांचे कौटुंबीक संबंध असल्याचंही त्यांनी सांगितलं. या घटनेनंतर विरोधकांच्या मागणीमुळे तसेच नि:पक्ष चौकशीसाठी रुपाली चाकणकरांचा (Rupali chakankar) राजीनामा घेण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनीही याबाबत माहिती दिली असून आता रुपाली चाकणकर यांचे प्रदेशाध्यपदही जाणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरुन रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिल्यानंतर आता त्यांचा पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा घेणार का? असा प्रश्न राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना विचारण्यात आला होता. त्यावर, भुजबळ यांनी स्पष्टपणे उत्तर दिले. संवैधानिक पदाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याचा निर्णय घेतला. मात्र, पक्षाच्या अध्यक्ष पदाबाबत पक्षाचे वरिष्ठ नेते आणि राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार निर्णय घेतील. संपूर्ण चौकशी करून त्यावर निर्णय होतो, असे देखील त्यांनी यावेळी सांगितले. तर, ज्या महिलांवर अन्याय झाला असेल त्यांनी पुढे येऊन आपली तक्रार दिली पाहिजे, जे अधिकारी नेमले आहेत ते चौकशी करून कारवाई करतील, असे देखील छगन भुजबळ म्हणाले.
राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवला - पवार
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा राजीनामा मला प्राप्त झाला आहे. सद्य परिस्थिती आणि सुरू असलेल्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पदाचा त्याग करण्याचा निर्णय घेतला आहे. ही चौकशी निष्पक्ष आणि पारदर्शक होण्याच्या दृष्टीकोनातून मी त्यांचा राजीनामा पुढील कार्यवाहीसाठी मुख्यमंत्री यांच्याकडे पाठवत आहे, असे सुनेत्रा पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन सांगितले.
राजीनामा देतानाही मॉडेलिंगसारखं उभ्या - दमानिया
राजीनामा स्वीकारतानासुद्धा जे दिसलं ते म्हणजे सुनेत्रा पवारांचा चेहरा गंभीर होता, पण रुपाली चाकणकर या तर जसं मॉडेलिंगसाठी उभं राहतात, तशी पोझ देतानाचा फोटो होता. आणि त्यानंतरचं त्यांचं बोलणं ऐकलं तर त्यात कुठेही खेद, विनम्रता नव्हती , एक अहंकार होता. हे सगळं पाहून वाटतं की चाकणकरांना खरंच इंट्रोस्पेक्शन करण्याची गरज आहे. दरम्यान, शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली ठोंबरे यांनीही चाकणकरांना सहआरोपी करा, अशी मागणी केली आहे.
हेही वाचा
भास्कर जाधवांचा खळबळजनक दावा; SIT आधीच नेमल्याची माहिती, उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचाही सहभाग?
