पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे (NCPSP) कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी महायुती सरकारमधील अर्थ खात्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सुनेत्रा पवार यांना भेट नाकारली त्यामुळे राष्ट्रवादीला अर्थखातं मिळण्याची शक्यता कमी असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. काँग्रेसने सुनेत्रा पवार यांना गुंगी गुडिया म्हणून केलेल्या टकेवर देखील रोहित पवार यांनी भाष्य केलं. तर, डिलिमेटशनच्या विरोधात आमचे खासदार मतदान करतील, असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला.
रोहित पवार काय म्हणाले?
आमदार रोहित पवार यांनी दावा केला की अमित शाह मुंबईत आले होते तेव्हा त्यांनी सुनेत्रा काकींना भेट नाकारली, त्यामुळे एवढं महत्त्वाचं अर्थ खातं मिळेल असं वाटत तरी नाही. अर्थ खातं खरंतर हक्क हा अजित दादांच्या पक्षाचा आहे, असं पवार यांनी म्हटलं. अजित दादा नसताना मात्र कुठे ना कुठेतरी हळूहळू त्या पक्षाची ताकद कमी करण्याचा भाजपने प्रयत्न केला आहे हे आम्ही आधी अनेक वेळा त्या ठिकाणी बोलून दाखवलेल आहे. त्यामुळे ते अर्थ खातं हातात आलं तर मग बऱ्याच महत्त्वाच्या नाड्या हातामध्ये येतात आणि ते भाजपाला नको असावं, एकनाथ शिंदेना पण नको असावं म्हणून त्यांना अर्थ खातं मिळेल असं मला तरी वाटत नाही, त्याला भांडावं लागेल, त्यांना ताकद दाखवावी लागेल, असं रोहित पवार यांनी म्हटलं.
सुनेत्रा पवार यांच्यावरील काँग्रेसच्या टीकेवर रोहित पवार काय म्हणाले?
विरोधक आपल्यावर काही बोलू शकतात, आपल्याला सिद्ध करावं लागतं. तुमच्याकडे पद आहे तुम्ही या राज्याच्या उपमुख्यमंत्री आहात, त्या पदाचा योग्य वापर करून तुम्ही धाडसी निर्णय घेऊ शकता, हे कुठेतरी लोकांना तुम्हाला दाखवाव लागेल, असं रोहित पवार म्हणाले. तुम्ही ज्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये असता त्याच्यात तुमच्याच पक्षाचे इतर नेते असं काय वागतात की तेच कुठेतरी त्या पक्षाचे अध्यक्ष आहेत. पत्रकारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतात हे योग्य नाही, त्यामुळे त्या पदाचा योग्य वापर करून कुठेतरी स्पष्ट भूमिका घेऊन आक्रमक पद्धतीने भूमिका घेणं पण तितकंच अपेक्षित आहे, असं रोहित पवार यांनी म्हटलं.
डिलिमेटनशच्या विरोधात खासदार मतदान करतील
माझा विश्वास आहे की आमचे सर्व आठ खासदार डिलिमिटेशनच्या विरोधात मतदान करतील. कोणी अनुपस्थित राहणार नाही, उपस्थित राहून डीलिमिटेशनच्या विरोधात मतदान करतील.लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघावर भाजपने 2016पासून काम केलंय, 2011 ला जे अधिकारी डिलिमिटेशनमध्ये सहभागी होते, त्यांना आता त्यांनी पगारावर घेतलेलं आहे.वॉर्ड जसे फोडले तसेच जर लोकसभा आणि विधानसभा फोडायला लागले तर मग लोकशाही या देशामध्ये राहील असं आम्हाला वाटत नाही, असं रोहित पवार यांनी म्हटलं.
रोहित पवारांच्या टीकेवर प्रविण दरेकरांची प्रतिक्रिया
राष्ट्रवादी काँग्रेसला अर्थखातं मिळणार नाही असं रोहित पवार यांनी वक्तव्य केलं होतं त्यावर भाजपचे विधानपरिषद आमदार प्रविण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अमित शाह रोहित पवार यांना विचारून भेटी देत असतील किंवा त्यांचं बोलणं झालं असेल, असा टोला प्रविण दरेकर यांनी म्हटलं. अर्थमंत्री पदाचा काय करायचं हा सरकारचा विषय आहे. रोहित पवार भविष्यवेत्ते व्हायला लागले आहेत, मीडियात चर्चेत राहण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, असा दावा प्रविण दरेकर यांनी केला.
