Rohit Pawar and Ajit Pawar: अजितदादांची इच्छा पूर्ण होणार, पवार कुटुंब अन् राष्ट्रवादी एकत्र येणार का? रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
Rohit Pawar and Ajit Pawar: रोहित पवार अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत काही शंका उपस्थित करणार, 10 फेब्रुवारीला महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडणार आहे.

Rohit Pawar and Ajit Pawar: सगळ्या पवार कुटुंबाने एकत्र यावे, ही अजितदादांची इच्छा होती. अजितदादांची जागा कोणीही घेऊ शकत नाही. मात्र, एक परिवार म्हणून मी सुनेत्रा काकींमध्ये अजितदादांना (Ajit Pawar) पाहतो. त्यांना उपमुख्यमंत्रीपद आणि अजितदादांकडील सगळी खाती मिळावीत, ही आमची इच्छा होती. आता सुनेत्रा वहिनीच पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्या पाहिजेत, असे वक्तव्य रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केले. ते बारामती जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मतदान केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (Baramati news)
अजितदादांची मनापासूनची इच्छा होती की, पवार कुटुंबातील सर्वजण परिवार म्हणून सगळे एकत्र आले पाहिजेत. त्यासाठी दादांकडून प्रयत्न केला जात होता. सुप्रिया ताई, पवार साहेब आम्हीही असाच प्रयत्न करत होतो. दु:खद घटना घडल्यावर 13 दिवस आम्ही परिवार म्हणून एकत्र आहोत. अजितदादांचं स्वप्नं होतं की, परिवार म्हणून आपण एकत्रित राहिलं पाहिजे. त्यानुसार कुठेही न ठरवत आज काटेवाडीत श्रीनिवास पवार, पार्थ पवार, सुनेत्रा पवार एकत्र मतदानला पोहोचले, असे रोहित पवार यांनी म्हटले.
काल पवार साहेबांनी जय पवार आणि आम्हा सगळ्यांना मार्गदर्शन केले. ते मार्गदर्शन भावनिक स्वरुपाचे होते. काही गोष्टी आपल्याला येणाऱ्या काळात कराव्या लागतील, दादांच्या स्मरणार्थ काही गोष्टी करायच्या आहेत, त्याबाबत काल संध्याकाळी चर्चा झाली. एखादी गोष्ट पवार साहेबांच्या मनातआली की, ते बोलावून घेतात आणि मार्गदर्शन करतात, असेही रोहित पवार यांनी सांगितले.
Rohit Pawar on Praful Patel: प्रफुल पटेल आणि सुनील तटकरेंबाबत रोहित पवार काय म्हणाले?
यावेळी रोहित पवार यांना सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर रोहित पवार यांनी बोलणे टाळले. मी फक्त 10 फेब्रुवारीला अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत असणाऱ्या काही शंका उपस्थित करणार आहे. तर 12 तारखेला मी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाबाबत काय ठरलं होतं, हे सांगणार आहे. आम्ही विलीनीकरण का करणार होतो, दादांच्या आणि आमच्या मनात नेमकं काय होतं, हे मी सांगणार आहे, असे रोहित पवार यांनी म्हटले.
NCP Latest news: पवार कुटुंबीयांमध्ये कोणतीही राजकीय चर्चा नाही: रोहित पवार
अजित पवार यांच्या निधनाच्या धक्क्यामुळे आम्हाला कोणालाही काही सूचत नव्हते. त्यामुळे आमच्या मनात कोणतेही राजकीय विचार आले नव्हते. आता या धक्क्यातून बाहेर पडून आम्ही राजकीय विचार करायला सुरुवात करु. पवार कुटुंबीयांमध्ये आतापर्यंत कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही. 9 तारखेनंतर या सगळ्याला सुरुवात होईल, असे रोहित पवार यांनी सांगितले.
आणखी वाचा
अजितदादांशिवाय पहिल्यांदाच सुनेत्रा वहिनी मतदानाला पोहोचल्या, अजित पवारांची 'ती' परंपरा पाळली
























