Rohit Pawar on Devendra Fadnavis : पुण्यातील एमआयडीसीमध्ये अजितदादांची दादागिरी आहे का? फडणवीसांनी नावं जाहीर करावी; मुख्यमंत्र्यांच्या विधानावर रोहित पवारांचा हल्लाबोल
Rohit Pawar on Devendra Fadnavis : उद्योग क्षेत्रात घुसलेली दादागिरी हा पुण्याच्या विकासातील दुर्दैवाने सर्वांत मोठा अडथळा असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते.

Rohit Pawar on Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पुणे हे माहिती तंत्रज्ञान आणि उद्योगनगरी म्हणून ओळखले जाणारे शहर आहे. पुण्यात मोठ्या व नामांकित कंपन्या गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत. मात्र, गुंतवणूकदारांवर "आमच्या माणसांनाच काम द्या, आम्हालाच कंत्राट द्या, आम्ही सांगू त्या दरानेच काम करा" असा दबाव टाकला जातो. ही दबावाची मानसिकता जर थांबवली नाही, तर पुण्याचा विकास साध्य होणे अशक्य आहे. उद्योग क्षेत्रात घुसलेली दादागिरी हा पुण्याच्या विकासातील दुर्दैवाने सर्वांत मोठा अडथळा आहे, असे वक्तव्य केले. यावरून आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय.
पुण्यातील एमआयडीसीमध्ये अजितदादांची दादागिरी आहे का?
रोहित पवार म्हणाले की, पुण्यातून अनेक कंपन्या जात आहेत. तळेगाव, चाकण या परिसरातील आणि कंपन्या जात आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जर व्यासपीठावर दादागिरी असे म्हणत असतील तर तुम्ही काय करत आहात? असा प्रश्न निर्माण होतो. पुण्यातील एमआयडीसीमध्ये दादांची दादागिरी आहे का? अजितदादांच्या पक्षाची दादागिरी आहे की भाजपची की एकनाथ शिंदे यांच्या नेत्यांची दादागिरी आहे, हे एकदा स्पष्ट झालं पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांनी कोण दादागिरी करतं याची नावे लवकरात लवकर जाहीर करावी, असे त्यांनी म्हटले. विकासाचा दर खुंटला आहे. देवेंद्र फडणवीस यांना सगळं माहीत असताना आणि सगळ्या कंपन्या गुजरातला जात असतील, ही भूमिका कदाचित भाजपची असावी, असे देखील रोहित पवार यांनी म्हटले आहे.
...तर तुम्हाला महाराष्ट्र माफ करणार नाही
सरळ काम तर सगळेच करतात, पण एखादं असं वाकडं करून पुन्हा नियमांत बसवणारं काम जे करतात त्याची माणसं नोंद ठेवतात, असे अजब विधान राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले. याबाबत विचारले असता रोहित पवार म्हणाले की, नवीन कृषिमंत्री काय म्हणाले तर वाकडी काम पण सरळ करावी लागतात, त्यांनी महाराष्ट्राचे तिजोरी वेडीवाकडी केली आहे. वाकड्यात काम करण्यासाठी कृषिमंत्रीपद दिलं नाही. सरळ काम करणाऱ्यांच्या मी पाठीशी राहतो, वाकडं काम जर तुमच्या हातून झालं तर तुम्हाला महाराष्ट्र माफ करणार नाही. आम्ही तुम्हाला माफ करणार नाही, असा इशारा त्यांनी दत्तात्रय भरणे यांना दिला.
आणखी वाचा






















