Rohit Pawar on Ajit Pawar Plane Crash: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत घातपाताचा संशय व्यक्त करणारे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे सध्या दिल्लीत राहून एक महत्त्वाचे काम पार पाडत आहेत. रोहित पवार (Rohit Pawar) यांनी काही दिवसांपूर्वीच पत्रकार परिषद घेऊन अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विमान अपघातामागे काहीतरी काळंबेरं असल्याची शक्यता बोलून दाखवली होती. सरकारने या अपघाताची (Ajit Pawar Plane Crash) चौकशी लावण्यापलीकडे फार काही केले नव्हते. त्यामुळे आता रोहित पवार यांनी आपल्या काकांच्या विमान अपघातामागील खरे कारण शोधण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ते सध्या दिल्लीत हवाई क्षेत्रात वैमानिक व अन्य पदांवर राहिलेल्या अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेत आहेत.  

Continues below advertisement

अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाचा अहवाल येण्यास वेळ लागू शकतो, असे अधिकाऱ्यांचे मत आहे. मात्र, हा अहवाल लवकरात लवकर मिळावा यासाठी रोहित पवार हे खासगी गुप्तहेरांची मदत घेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अजित पवार यांच्या विमान अपघाताचं सत्य लवकरात लवकर  समोर आणण्यासाठी रोहित पवार यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती आहे.

स्वर्गीय अजित दादांच्या दुर्दैवी अपघाताचा आज 20 वा दिवस असून अद्यापही DGCA कडून प्राथमिक चौकशी अहवाल आलेला नाही. तसेच सर्व नियमांचे उल्लंघन करत विमाने चालवणाऱ्या VSR कंपनीविरोधात देखील काहीही कारवाई अद्यापर्यंत झालेली नाही. परिणामी शंका अधिक बळावत चालल्या आहेत. त्यामुळे DGCA ने लवकरात लवकर प्राथमिक चौकशी अहवाल द्यावा तसेच VSR वर योग्य ती कारवाई करावी, अशी पोस्ट रोहित पवार यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. 

Continues below advertisement

अजित पवार 28 जानेवारीला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी बारामती येथे येत असताना त्यांच्या विमानाचा अपघात झाला होता. बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर उतरताना त्यांचे विमान कोसळले होते. अजित पवार यांच्या चार्टर्ड विमानाने सकाळी 8 वाजून 10 मिनिटांनी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन उड्डाण केले होते. हे विमान साधारण 8.45 च्या सुमारास बारामतीच्या आसपास पोहोचले. हे विमान बारामती विमानतळाच्या रनवेवर उतरण्यापूर्वी बाजूच्या शेतात जाऊन कोसळले. खाली कोसळल्यानंतर या विमानाचा स्फोट झाला होता. यामध्ये अजित पवार यांच्यासह विमानातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला होता. सध्या या विमान दुर्घटनेची संबंधित यंत्रणांकडून चौकशी सुरु आहे. मात्र, या सगळ्यातून अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत निर्माण झालेले संशयाचे धुके अद्याप दूर झालेले नाही.

आणखी वाचा

अजित पवारांच्या विमानाचा अपघात की घातपात? गोपीचंद पडळकर पहिल्यांदाच बोलले, म्हणाले...