मुंबई : शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) अचानक मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाले आहेत. प्रकृती अस्वस्थामुळे ते रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, काही वेळापूर्वी मुंबईच्या वांद्रे येथील एसआरए कार्यालयात त्यांनी भेट देत आयुक्तांशी चर्चा केली होती. मात्र, या भेटीनंतर त्यांना त्रास जाणवू लागल्याने ते उपचारांसाठी ब्रीच कँडी (Hospital) रुग्णालयात दाखल झाले आहेत. दरम्यान, रोहित पवार राजकीय जीवनात अत्यंत सक्रीय असल्याने दगदग व धावपळ करत असतात.
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांची मुंबईतील एसआरए कार्यालयात योगायोगाने भेट झाली. हे दोन्ही नेते वेगवेगळ्या कामासाठी येथे आले होते. रोहित पवारांनी मुंबईतील प्रलंबित प्रश्नांच्या अनुषंगाने एसआरएचे सीईओ महेंद्र कल्याणकर यांची भेट घेतली. या भेटीच्या निमित्ताने मुंबईतील रखडलेल्या प्रकल्पांची (SRA) घर भाडे देण्यात यावीत. 5 ते 10 वर्षे प्रकल्प प्रलंबित आहेत. याशिवाय भाडे देखील देण्यात आलेली नाहीत, ही बाब रोहित पवारांनी निदर्शनास आणून दिली. तसेच, एसआरए कार्यालयातील दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणीही त्यांनी केलीय. त्यानंतर, पत्रकारांशी संवाद साधत संबंधित माहिती देखील त्यांनी दिली. मात्र, त्रास जाणवू लागल्याने ते तिथून थेट ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाले आहेत.
दगदग धावपळ, रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीही ट्विट
दरम्यान, रोहित पवार राजकीय जीवनात कायम सक्रीय असलेले नेते आहेत. त्यामुळे, दररोज मोठा प्रवास, दगदग आणि गाठीभेटीमुळे त्यांचे शेड्युल व्यस्त असते. याच कामाचा ताण पडल्याने त्यांना त्रास होत असल्याचेही बोलले जात आहे. विशेष म्हणजे, रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी त्यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्या पारंपरिक मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत मतदारांनी जनसुराज पक्षाचे प्रशांत किशोर यांच्या विजयाबद्दलही ट्विट केले आहे. प्रशांत किशोर यांना विजयी करुन मतदारांनी भाजपाचं नाक कापलं. प्रत्येक गोष्टीला एक 'डेडलाईन' असते आणि भाजपाची ती डेडलाईन आता जवळ आली आहे, हेच या निकालाने दाखवून दिलं आहे, असेही त्यांनी म्हटलं आहे.
रोहित पवारांनी ट्विट करुन दिली माहिती
गेले 2-3 दिवस तब्येत साथ देत नसल्याने आणि याबाबत आज माध्यमांमधील बातम्या पाहून अनेक हितचिंतक फोन करतायत. आपल्या काळजीबद्दल धन्यवाद, पण काळजीचे काहीही कारण नाही. व्हायरल फ्लू किंवा इतर काही कारण आहे का, याबाबत तपासणी सुरू आहे. खरं तर डॉक्टरांनी आजार अंगावर न काढता सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला दिला, पण युवा पिढी शांत बसणारी नसते. तुमच्या सदिच्छाही पाठीशी आहेतच. त्यामुळं पुढील काही दिवस पती, मुलगा, वडील, भाऊ, जावई, मित्र या कौटुंबिक नात्यांसाठी जमेल तशी विश्रांती घेणार आहे पण एक लोकप्रतिनिधी म्हणून लोकांप्रती असलेलं कर्तव्यही प्रामाणिकपणे पार पाडतच राहणार आहे. लवकरच पूर्णतः बरा होऊन नव्या ऊर्जेने असंच काम सुरु राहील, अशी माहिती रोहित पवार यांनी ट्विट करुन दिली.
