मुंबई : शरद पवारांना बाप म्हणून, सुप्रियाताईंना मोठी बहीण म्हणून राजकीय पोळी भाजली. आता आमदारकीचा तुकडा काय टाकला की पक्ष सोडून गेले, अशांनी तर बोलूच नये असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी भाजप आमदार चित्रा वाघ यांना डिवचलं आहे.
महिला आरक्षण विधेयकावरून मुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी दिलेलं आव्हान खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वीकारलं. त्यानंतर भाजपच्या चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली. याच मुद्द्यावरून आता रोहिणी खडसे यांनी चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधला आहे.
रोहिणी खडसे म्हणाल्या की, "सुप्रियाताई सुळे यांनी खुलं आव्हान काय स्वीकारलं तर लोकांच्या पायाखालची जमीनच सरकलेली दिसत आहे. चर्चेला येण्याची त्यांची हिंमत नाही. आपण एक्सपोज होऊ म्हणून 'चित्रा'विचित्र माणासांना छू... म्हटलं."
रोहिणी खडसे म्हणाल्या की, "बरं या 'चित्रा'विचित्र माणसांची जागा काय? तर आधी यांनी आदरणीय शरद पवार साहेबांना बाप म्हणून, आदरणीय सुप्रियाताईंना मोठी बहीण म्हणून पदे मिळवली, स्वतःची राजकीय पोळी भाजून घेतली आणि आमदारकीचा तुकडा काय टाकला की पक्ष सोडून गेले. तिकडे गेल्यावर देखील पवार साहेब, सुप्रियाताई यांच्यावर टीका केल्यावरच यांचे घर चालते. अशा लोकांनी तरी सुप्रियाताई सुळेंवर बोलू नये."
नेमकं काय प्रकरण?
महिला आरक्षण विधेयक आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयक लोकसभेत नामंजूर झाल्यानंतर भाजपनं विरोधकांच्या विरोधात रान पेटवण्यास सुरुवात केलं आहे. महाराष्ट्रात स्वत: मुख्यमंत्री मैदानात उतरले आहेत. महिला आरक्षण विधेयकावर चर्चेसाठी विरोधकांमधलं कुणीही आपल्याशी चर्चा करावी असं खुलं आव्हान मुख्यमंत्र्यांनी दिलं. त्यावर राष्ट्रवादी शरद पवारांच्या खासदार सुप्रिया सुळेंनी हे चॅलेंज स्वीकारत मुख्यमंत्र्यांशी चर्चेसाठी तयार असल्याचं म्हटलं. मुख्यमंत्री सांगतील त्या ठिकाणी आम्ही चर्चेसाठी जाऊ असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं.
सुप्रिया सुळे यांच्या या वक्तव्यावर भाजपच्या आमदार चित्रा वाघ यांनी टीका केली. त्या म्हणाल्या की, "बारामतीच्या मोठ्या ताईंनी विनंती केली तरी समकक्ष कशाला म्हणतात हे त्यांनी समजून घ्यावं. मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं त्यांच्या समकक्ष नेते असतील त्यांच्यासोबत चर्चा करायला तयार आहेत. शरद पवार चर्चा करायला तयार असतील तर मुख्यमंत्री तयार असतील. चॅलेंज कोण देतोय हे पण महत्त्वाचं आहे."
ही बातमी वाचा:
