Rohini Khadse on Sanjay Gaikwad: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडणारे आणि कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित 'शिवाजी कोण होता' या पुस्तकावरून वाद निर्माण झाला आहे. या पुस्तकावर बुलढाणा येथील शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी आक्षेप घेत, प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोनवरून शिवीगाळ व धमकी दिल्याचा आरोप समोर आला आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा अनादर करणारे शीर्षक पुस्तकाला देण्यात आले आहे’ असा दावा करत आमदार गायकवाड यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, या संदर्भातील धमकी आणि अश्लील भाषेचा वापर झाल्याचा आरोप असलेली एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी संजय गायकवाड यांना चांगलेच सुनावले आहे.
रोहिणी खडसे म्हणाल्या की, "जब नाश मनुज पर छाता है, पहले विवेक मर जाता है", हिंदीतील ही प्रसिद्ध कविता आमदार संजय गायकवाड यांना तंतोतंत लागू पडते. कधी गरीब कर्मचाऱ्यांना मारहाण करतात तर काही विचित्र आणि वादग्रस्त वक्तव्य करून प्रसिद्धी मिळवत असतात. दिवंगत कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी तब्बल 37 वर्षांपूर्वी लिहलेल्या 'शिवाजी कोण होता', या पुस्तकाच्या शीर्षकाबाबत श्री. गायकवाड यांना अचानक साक्षात्कार झाला आहे. त्यांनी या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोन करुन जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
गायकवाड यांच्याकडून आपण अपेक्षा तरी काय करू शकतो ? वाचन आणि त्यांचा काही दूर दूरपर्यंत काही संबंध असेल याची शक्यता कमीच आहे. पण समाजात वितुष्ट निर्माण करण्यात, लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यात सत्ताधाऱ्यांनी पीएचडी घेतली आहे. खरंतर हे लोक लिटमस टेस्ट करत असतात, समाजात याची काय रिऍक्शन येते ते हे लोक पाहत असतात. पण कॉम्रेड पानसरेंसारखी विवेकी माणसं शेवटच्या क्षणापर्यंत समाजाची एकी आणि सत्याची कास धरून असतात, म्हणूनच ते अमर ठरतात, असे रोहिणी खडसे यांनी म्हटले आहे.
Sanjay Gaikwad : संजय गायकवाड यांचे स्पष्टीकरण
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या संभाषणाची ऑडिओ क्लीप हि मोडून-तोडून आणि काही शब्द वगळून प्रसारित करण्यात आली आहे. 21 तारखेला माझ्या पत्नीला एका कार्यक्रमात हे पुस्तक भेट म्हणून मिळालं. त्यांनतर हे पुस्तक घरी दिसल्यानंतर मी वाचलं. यात मराठ्यांचा गौरवशाली इतिहासाला छेडछाड करून एकेरी भाषेत उल्लेख केला आहे. प्रत्येक पानात शिवाजी कोण होता? मराठा, क्षत्रिय होता कि नव्हता, असा महाराजांचा एकेरी उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना मी फोन केला, सुरवातीला मी भाऊ म्हणून विचारणा केली, आणि हे पुस्तक तुम्ही प्रकाशित केलंय का म्हणून प्रश्न केला.
त्यानंतर शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख का केला म्हणून जाब विचारला , त्यावर ते पुस्तक जुनं आहे, अमुक-अमुक व्यक्तीने लिहलंय, असं सांगितलं. मात्र प्रकाशन करताना तुम्ही एकेरी उल्लेख असलेलं पुस्तक का प्रकाशित केलं? महाराष्ट्रात वारंवार महाराजांची विटंबना का केली जाते? हे आपल्याला सहन होत नाही. त्यानंतर त्यांनी जातीचा उल्लेख करत मुजोरी केली. त्यामुळे मी शिवीगाळ केली. सारखा सारखा तो व्यक्ती डिवचत होता, म्हणून मी शिवीगाळ केली. असे स्पष्टीकरण देखील आमदार संजय गायकवाड यांनी यावेळी दिलं आहे.
आणखी वाचा
