शरद पवारांचा उमेदवार मैदानात, ठाकरेंची चिंता वाढली, मराठवाडा पदवीधर मतदारसंघात मविआत बंडखोरी
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलं आहे. सर्वच राजकीय पक्षांनी ताकद लावली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमध्येही बंडखोरी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

Chhatrapati Sambhajinagar Graduate Constituency Election : पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. सर्वच राजकीय पक्षांनी ताकद पणाला लावली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमध्येही बंडखोरी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीसमोर बंडखोरीचे मोठं आव्हान उभे राहिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष प्रतापसिंह पाटील यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते राजेश टोपे देखील उपस्थित होते.
महाविकास आघाडीतील उमेदवारीचा अंतिम निर्णय काय होणार?
महाविकास आघाडीकडून कालच शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार दिलीप घुगे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे आता महाविकास आघाडीतही उमेदवारीवरून चुरस निर्माण झाली आहे. दरम्यान, दिलीप घुगे आपला उमेदवारी अर्ज मागे घेतील, असा विश्वास प्रतापसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे. तर ठाकरे गटाशी चर्चा सुरू असून निश्चितच त्यांचा उमेदवार अर्ज मागे घेईल, अशी प्रतिक्रिया राजेश टोपे यांनी दिली आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीतील उमेदवारीचा अंतिम निर्णय काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महायुतीतही बंडखोरी
मराठवाडा पदवीधर निवडणुकीमध्ये महायुतीची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पारड्यात पडल्याची चर्चा होती. माजी आमदार सतीश चव्हाण यांनी महायुतीकडून उमेदवारीचा अर्ज दाखल केला होता. मात्र आता, महायुतीत भाजपचा एम. के . देशमुख यांनी बंडखोरी करत उद्या अर्ज भरणार असल्याची घोषणा केलीय. त्यामुळे महायुतीतच बंडखोरी झाल्याची चर्चा रंगली आहे. दुसरीकडे, मराठवाडा पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार दिलीप घुगे यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे घुगे विरुद्ध सतीश चव्हाण असा सामना रंगणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र आता महायुतीतूनच भाजपचे एम. के . देशमुख यांनी उद्या अर्ज भरणार असल्याचं सांगितल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. मराठवाडा पदवीधर निवडणुकीमध्ये महायुतीत भाजपच्या एम. के. देशमुख यांनी बंडखोरी करीत उद्या अर्ज भरणार असल्याची घोषणा केलीय. एम. के. देशमुख हे माजी शिक्षणाधिकारी आहेत. 2024 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी ते निवृत्त झाले होते. त्या निवडणुकीत त्यांनी भाजपचे उमेदवार अतुल सावे यांच्या विरोधात निवडणुकीत उभे होते. मात्र ऐनवेळी त्यांनी उमेदवारी मागे घेतली. त्यावेळी भाजपकडून पदवीधर निवडणुकीत तिकीट दिले जाईल असे आश्वासन दिले होते अशी चर्चा आहे.
मराठवाडा पदवीधर निवडणूक, महत्वाचे उमेदवार
सतीश चव्हाण (महायुती-राष्ट्रवादी अजित पवार गट)
दिलीप घुगे (महाविकास आघाडी- ठाकरे गट)
प्रतापसिंह पाटील (बंडखोरी-राष्ट्रवादी शरद पवार गट)
एम के देशमुख (बंडखोरी-भाजप)
रविराज साबळे (रिल्सस्टार)
रमेश पाटील (रिल्सस्टार)






















