Ravindra Chavan : नागपूर पदवीधरमध्ये बंडखोरी करत अनिल सोलेंकडून अर्ज दाखल, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण सोले यांच्या घरी पोहोचले पण...
Ravindra Chavan : नागपूर पदवीधर मतदारसंघातून अनिल सोले यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सोले यांच्या घरी भेट दिली.

नागपूर : महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या पाच जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. भाजपनं पुणे पदवीधर, पुणे शिक्षक आणि नागपूर पदवीधरसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. नागपूर पदवीधर मतदारसंघातून भाजपनं सुधाकर कोहळे यांना उमेदवारी दिली आहे. तर, अनिल सोले यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अनिल सोले यांच्या घरी भेट दिली. मात्र, अनिल सोले घरी नसल्यानं त्यांची भेट होऊ शकली नाही. नागपूर पदवीधर मतदारसंघाची जागा भाजप जिंकेल, असा विश्वास रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला.
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण नागपुरात भाजप बंडखोर उमेदवार अनिल सोले यांच्या घरी दाखल झाले होते. अनिल सोले आमचे वरिष्ठ कार्यकर्ते व निष्ठावंत पदाधिकारी आहेत. उमेदवारीवरून ते काहीसे नाराज आहेत. त्यामुळे त्यांना भेटून त्यांच्या मनातील भावना जाणून घेण्यासाठी त्यांच्या घरी आल्याची प्रतिक्रिया एबीपी माझाशी एक्सक्लुझिव्ह बातचीत करताना रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे.
रवींद्र चव्हाण सोलेंच्या घरी पोहोचले तेव्हा अनिल सोले घरी नव्हते, त्यामुळे रवींद्र चव्हाण यांची भेट होऊ शकली नाही. मात्र पुढील दोन-तीन दिवसात पक्षातील वरिष्ठ नेते अनिल सोले यांच्याशी भेटतील आणि त्यांची नाराजी दूर करतील. अनिल सोले पक्षासोबत ची त्यांची निष्ठा कायम ठेवतील, असा विश्वासही चव्हाण यांनी व्यक्त केला.भाजप नागपूर पदवीधर मतदारसंघाची निवडणूक निश्चितच जी केल असा विश्वासही रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला.
अर्ज माघार घेणार नाही, अनिल सोले यांची भूमिका
नागपूर विभाग पदवीधर मतदार संघातून अनिल सोले यांनी आज दुपारी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. कार्यकर्त्यांची, पाठिराख्यांची, या मतदारसंघात गेल्या 25 वर्षात मला सहकार्य करणाऱ्या शिक्षकांची भावना होती मी उमेदवारी दाखल केली पाहिजे. त्यांच्या प्रेमाखातर, आग्रहखातर आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, असं अनिल सोले म्हणाले.
माझा मतदारांवर पूर्ण विश्वास आहे. निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्धार आम्ही केला आहे. आम्ही शिस्तबद्ध पद्धतीनेच भूमिका मांडली आहे. ही निवडणूक ही मी आणि माझे सर्व सहकारी शिस्तबद्ध पद्धतीने आणि निष्ठेने लढतील.मला मुख्यमंत्र्यांचा फोन आलेला नाही.मात्र गेले अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री फडणवीस, नितीन गडकरी, बावनकुळे आणि पक्षातील इतर नेत्यांना या निवडणुकी संदर्भात भूमिका सांगितली होती.त्यामुळे माघार घेण्याचा प्रश्न उद्भवत नाही. आमचा निर्णय झालेला आहे. मी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मी निवडणूक लढवणार आहे, असं अनिल सोले यांनी म्हटलं.





















