Ramdas Kadam on Sanjay Raut : निवडणूक आयोगाने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दबावाखाली शिवसेना पक्ष 5 हजार कोटींना एकनाथ शिंदे गटाला विकल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. यावर आता राजकीय स्तरातून विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांच्या विधानांवर आता कोणीही विश्वास ठेवत नाही, त्यांना कोणी गंभीरपणे घेत नाही. सकाळी उठून एखादा फेक बॉम्ब टाकायचा, काहीतरी विधाने करुन प्रसिद्धी मिळवायची, यापलीकडे त्यांच्या बोलण्यात काहीही तथ्य नसते असे कदम म्हणाले. शिंदेंना पक्ष 5 हजार कोटींना विकला हा आरोप करताना ते स्वतः नोटा मोजायला गेले होते का? त्यांच्याकडे असा काही पुरावा किंवा फोटो आहे का? फक्त हवेत तलवारी चालवून प्रसिद्धी मिळवण्याचे काम सुरु असल्याचे राऊत म्हणाले.
स्वतःची फाटलेली आघाडी कशी जोडता येईल, याकडे लक्ष द्या
अमित शाह उपपंतप्रधान झाले तर तुमचे काय बिघडते? सत्ता आणि सरकार त्यांचेच आहे असेही रामदास कदम म्हणाले. दुसऱ्यांवर आरोप करण्यापेक्षा स्वतःची फाटलेली आघाडी कशी जोडता येईल, याकडे आधी लक्ष द्या असेही कदम म्हणाले.
मुंबई महानगरपालिकेत गेल्या 25 वर्षांत कशा प्रकारे कामे दिली गेली याचा अभ्यास व्हावा
गिरीश महाजन यांच्या नातेवाईकावर झालेल्या कारवाईबाबत बोलताना रामदास कदम म्हणाले की, एखाद्या मंत्र्याचा नातेवाईक असतानाही त्याच्यावर कारवाई आणि चौकशी होत असेल, तर महाराष्ट्र शासन किती पारदर्शक पद्धतीने काम करत आहे हे सिद्ध होते. मुंबई महानगरपालिकेत गेल्या 25 वर्षांत कशा प्रकारे कामे दिली गेली आणि कारभार चालला, याचा अभ्यास सर्वांनी करून घेतला पाहिजे असा टोला कदमांनी ठाकरेंना लगावला.
सीमाभागातील मराठी माणसावर नेहमीच अन्याय झाला
बेळगाव सीमा प्रश्न व मराठी भाषा संदर्भात भाषावार प्रांतरचना झाल्यानंतर सीमाभागातील मराठी माणसावर नेहमीच अन्याय झाला आहे. हे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) प्रलंबित असून त्यावर लवकरच निकाल येणे अपेक्षित आहे. स्वतः पंतप्रधानांनी या विषयात वैयक्तिक लक्ष घातल्यास सीमाभागातील मराठी माणसाला नक्कीच न्याय मिळेल असे रामदास कदम म्हणाले.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना राज्यात किती कारखाने बंद पडले?
राज्यातील बंद पडलेल्या कारखान्याच्या मुद्द्यावर देखील कदमांनी प्रतिक्रिया दिली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना राज्यात किती कारखाने बंद पडले, याचा हिशोब त्यांनी आधी द्यावा अशी टीका त्यांनी केली. आर्थिक मंदी किंवा कारखाने बंद पडणे ही समस्या केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित नाही; तरीदेखील महाराष्ट्र आजही उद्योगांमध्ये देशात पहिल्या क्रमांकावर आहे असे रामदास कदम म्हणाले.