रत्नागिरी : बेळगाव-खानापूर न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. सीमा प्रश्नावरील आंदोलनाच्या गुन्ह्यात पुराव्याअभावी शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam ) आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते नितीन बानगुडे पाटील (Nitin Bangude Patil) यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तब्बल 20 वर्षानंतर या प्रकरणाचा निकाल लागला आहे.
प्रक्षोभक भाषणाच्या आरोपावरून खानापूर पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला होता
खानापूर सीमा प्रश्नावरून 2006 मध्ये झालेल्या आंदोलनप्रकरणी माजी मंत्री रामदास कदम आणि नितीन बानगुडे पाटील यांची तब्बल 20 वर्षांनंतर निर्दोष मुक्तता केली आहे. खानापूर न्यायालयाने पुराव्याअभावी दोघांचीही निर्दोष मुक्तता केली. 2006 मध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने खानापूर येथे सीमा प्रश्नासंदर्भात मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात महाराष्ट्रातील नेते उपस्थित होते. त्यावेळी रामदास कदम आणि नितीन बानगुडे पाटील यांनी कर्नाटक सरकारच्या विरोधात भाषण केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रक्षोभक भाषणाच्या आरोपावरून खानापूर पोलिसांनी दोघांविरोधात भारतीय दंडसंहिता कलम 153 आणि 153/ए अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर तब्बल दोन दशके या प्रकरणाची न्यायालयीन सुनावणी सुरू होती.
पुराव्याअभावी रामदास कदम आणि नितीन बानगुडे पाटील यांची निर्दोष मुक्तता
सुनावणीदरम्यान रामदास कदम आणि नितीन बानगुडे पाटील न्यायालयात हजर राहिले नसल्याने त्यांच्याविरोधात दोन वेळा पकड वॉरंटही जारी करण्यात आले होते. यावेळी समितीचे कार्यकर्ते यशवंत बिरजे आणि महादेव चाडी यांनी न्यायालयात जामीन राहिले. रामदास कदम यांना 10 लाख रुपयांच्या जामिनावर सोडण्यात आले होते. अखेर सलग सुनावणीनंतर 11 ऑगस्ट 2026 रोजी खानापूर न्यायालयाने पुराव्याअभावी रामदास कदम आणि नितीन बानगुडे पाटील यांची निर्दोष मुक्तता केली. दोन दशकांपासून सुरू असलेल्या सीमा प्रश्नावरील आंदोलनाच्या गुन्ह्याला अखेर पूर्णविराम मिळाला आहे.
दरम्यान, 2006 मध्ये खानापूर सीमा प्रश्नावरून शिवसेनेच्या वतीनं मेळावा आयोजीत करण्यात आला होता. या मेळाव्यात शिवसेनेचे नेते रामदास कदम आणि प्रा, नितीन बानगुडे पाटील यांनी आक्रमक भाषण केले होते. या दोन्ही नेत्यांनी कर्नाटक सरकारच्या विरोधात भाषण केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर रामदास कदम आणि प्रा, नितीन बानगुडे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. अखेर 20 वर्षानंतर या प्रकरणाचा निकाल लागला आहे. दोघांचीगी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.