Rajya Sabha Election 2026 Explained : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने 4 उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपकडून रामदास आठवले,  विनोद तावडे, श्रीमती माया चिंतामण ईवनाते  आणि रामराव वडकुते यांना उमेदवारी दिली आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून 7 जागा निवडल्या जाणार आहेत.  महाराष्ट्रातील संख्याबळानुसार भाजपचे 4 उमेदवार हमखास निवडून येऊ शकतात. त्यानुसार भाजपने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. 

निवडणूक आयोगाने 10 राज्यांमधील 37 राज्यसभेच्या जागांसाठी निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. या 37 जागांसाठी 16 मार्च रोजी निवडणुका होणार आहेत. रिक्त जागांपैकी 12 जागांवर एनडीए आहे, तर 25 जागांवर विरोधी पक्षांचा समावेश आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक (7) जागा आहेत, त्यानंतर तामिळनाडू (6) आणि पश्चिम बंगाल आणि बिहार (प्रत्येकी 5) आहेत. महाराष्ट्रातील शरद पवार, रामदास आठवले, कनिमोझी, तिरुची शिवा आणि राज्यसभेचे उपसभापती हरिवंश, प्रियांका चतुर्वेदी यांचा कार्यकाळ 2 एप्रिल रोजी संपत आहे. 16 मार्च रोजी मतदान होईल आणि त्याच दिवशी संध्याकाळी पाच वाजता मतमोजणी होईल.

राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून सर्वाधिक 7 जागांसाठी निवडणूक होणार आहे. महाराष्ट्रातील 7 जागांसाठी होणारी ही निवडणूक राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे. विधानसभेतील पक्षीय संख्याबळाच्या पार्श्वभूमीवर कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याचदरम्यान, एक महत्वाची माहिती समोर आली आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, अर्ज भरण्याची अंतिम तारीख 5 मार्च निश्चित करण्यात आली आहे. त्यानंतर 6 मार्च रोजी अर्जांची छाननी केली जाईल. उमेदवारांना माघार घेण्यासाठी 9 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे. मतदानाची प्रक्रिया 16 मार्च रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत पार पडणार आहे. त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार असून निकाल त्यानंतर जाहीर केले जातील. (Rajyasabha Election 2026)

महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 7 रिक्त जागा, निवडून येण्याचं समीकरण काय? (Maharashtra Rajya Sabha Election 2026)

विधानसभेचे आमदार 286  

  • अजित पवार आणि शिवाजी कर्डिलेंच्या निधनाने 2 जागा रिक्त 
  • कोटा = एकूण आमदार (286) भागीले रिक्त जागा 7 + 1 याच्या उत्तरात + 1 मिळवायचे.
  • म्हणजेच = 286 / 8 =35.75
  •  35.75 + 1            = 36.75 
  • राज्यसभेवर निवडून येण्यासाठी उमेदवाराला  36.75 म्हणजेच 37 मते मिळायला हवीत.

कोणाचे संख्याबळ किती? (Maharashtra BJP Shivsena NCP Congress MLA)

  • भाजपा- 132 - 1 = 131
  • शिवसेना (शिंदे गट)- 57
  • राष्ट्रवादी (अजित पवार गट)- 41 - 1 = 40
  • काँग्रेस- 16
  • राष्ट्रवादी (शरद पवार गट)- 10
  • शिवसेना (ठाकरे गट)- 20
  • समाजवादी पार्टी- 2
  • जनसुराज्य शक्ती- 2
  • राष्ट्रीय युवा स्वाभीमान पार्टी- 1
  • राष्ट्रीय समाज पक्ष- रासप- 1
  • एमआयएम- 1 जागा
  • सीपीआय (एम)- 1
  • पिजन्ट्स अँड वर्कर्स पार्टी ऑफ इँडिया- पीडब्ल्यूपीआय- 1
  • राजर्षी शाहू विकास आघाडी- 1 (राजेंद्र यड्रावकर)
  • अपक्ष- 2 (शिवाजी पाटील आणि शरद सोनावणे)       
  • महायुती = 131 + 57 + 40 + 2 + 1+1 + 2= 234 (2 आमदारांचं निधन)
  • मविआ = 16+10+20+2+1 = 49
  • इतर = 03 
  • एकूण = 286

कुणाचे किती खासदार निवडून येऊ शकतात? (Mahavikas Aghadi vs Mahayuti)

  • भाजपकडे  131 + 1 अपक्षाचा पाठिंबा असे 132 आमदार
  • जर एक खासदार निवडण्यासाठी 37 मतांची गरज असेल तर 132/37 = 3.56
  • म्हणजे एकट्या भाजपचे 3 ते 4 खासदार निवडून येऊ शकतात. 

शिवसेना शिंदे =  57 + 1 अपक्षाचा पाठिंबा असे 58 आमदार 

  • जर एक खासदार निवडण्यासाठी 37 मतांची गरज असेल तर 58/37 = 1.56 
  • म्हणजे एकट्या शिंदेसेनेचा 1 खासदार निवडून येऊ शकतो. 
  • शिंदेंकडे 20 मते अतिरिक्त असतील.

राष्ट्रवादी (अजित पवार गट)- 41 - 1 = 40

  • जर एक खासदार निवडण्यासाठी 37 मतांची गरज असेल तर 40/37 = 1.08
  • म्हणजे एकट्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा 1 खासदार निवडून येऊ शकतो.
  • राष्ट्रवादीकडे 3 मते अतिरिक्त असतील.

मविआचे किती खासदार निवडून येऊ शकतात? (How many MPs Elected From Mahavikas Ahadi)

  • काँग्रेस- 16 +राष्ट्रवादी (शरद पवार गट)  10 + शिवसेना (ठाकरे गट)- 20 = 46
  • मविआला पाठिंबा देणारे छोटे पक्ष = सपा 2 + माकप  1 = 3
  • मविआकडे 46+3 = 49 आमदारांचं बळ
  • जर एक खासदार निवडण्यासाठी 37 मतांची गरज असेल तर 49/37 = 1.32
  • म्हणजे मविआमध्ये सर्व पक्षांचा मिळून 1 खासदार निवडून येऊ शकतो. 
  • त्याउलट महायुतीमध्ये भाजपचे 3, शिंदेसेनेचा 1 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा 1 आणि अतिरिक्त मतांवरुन 1 असे 6 खासदार आरामात निवडून येतील

राज्यांना कोणत्या आधारावर जागा प्राप्त होतात? (How Rajya Sabha elections held?)

राज्यसभेत एकूण सदस्य संख्या 250 आहे. तथापि, यामधील 12 सदस्य हे राष्ट्रपती नियुक्त असतात. उर्वरित 238 सदस्य राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधीत्व करतात. यासाठी वेगवेगळ्या राज्यांमध्ये जागांचे वाटप केले जाते. राज्यातील लोकसंख्येच्या आधारावर कोणत्या राज्याला किती जागा मिळणार हे निश्चित केले जाते. अर्थातच, ज्या राज्याची लोकसंख्या सर्वाधिक आहे त्या राज्याला अधिक जागा मिळतात. उत्तर प्रदेश सर्वात मोठे राज्य असल्याने त्या राज्याला सर्वाधिक 31 जागा मिळतात.   

राज्यसभा सदस्य कोणत्या पद्धतीने निवडले जातात? (How Rajya Sabha Members Elected?)

राज्यसभा सदस्याची निवड करताना एक प्रतिनिधी एका वेळेला एकाच उमेदवाराला मतदान करू शकतो. तथापि, अपवादात्मक परिस्थितीमध्ये मत ट्रान्सफर सुद्धा होऊ शकते. समजा, ज्या उमेदवाराला मत देण्यात आलं आहे तो उमेदवार विजयी झाला असल्यास ते मत ट्रान्सफर केलं जातं. आणि दुसऱ्या उमेदवाराला इतकी कमी मते मिळाली आहेत त्यामध्ये तो विजयी होऊ शकत नाही अशावेळी मत ट्रान्सफर होऊ शकतं. त्यासाठीच प्राथमिकता ठरवून उमेदवारांना 1 पासून 4 पर्यंत नंबर दिले जातात.

महाराष्ट्रातून निवृत्त होणारे राज्यसभा सदस्य- (Retiring Rajya Sabha members from Maharashtra)

  1. शरद पवार (श.प. गट)
  2. रामदास आठवले (रिपाई) 
  3. फौजिया खान (श.प. गट)
  4. रजनी पाटील (काँग्रेस)
  5. प्रियांका चतुर्वेदी (ठाकरे सेना)
  6. धैर्यशील पाटील (पेण- भाजप)
  7. भागवत कराड (भाजप)

राज्यसभा निवडणुकीचे वेळापत्रक (Rajya Sabha Election 2026)

  • 5 मार्च – उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत
  • 6 मार्च – अर्जांची छाननी
  • 9 मार्च – उमेदवारी मागे घेण्याची शेवटची तारीख
  • 16 मार्च – सकाळी 9 ते सायं. 4 मतदान; सायं. 5 नंतर मतमोजणी

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

संबंधित बातमी:

Rajyasabha Election 2026: तावडे, पाटील, कराड...राज्यसभेसाठी भाजपकडून कोणाच्या नावाची चर्चा?; 5 नावं आली समोर