Rajya Sabha Election 2026 Meenakshi Natarajan: देशातील राज्यसभेच्या 24 जागांसाठी येत्या 18 जून रोजी निवडणूक होत आहे. यासाठी महाराष्ट्रासह देशभरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. पश्चिम बंगाल जिंकल्यानंतर विजयाचा वारु चौखूर उधळलेल्या भाजपने (BJP) या राज्यसभा निवडणुकीत आपले जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी डावेपच खेळले आहेत. मध्य प्रदेशात राज्यसभेच्या (Rajya Sabha Election 2026) एका जागेवरुन प्रचंड मोठे राजकीय नाट्य घडले आहे. मध्य प्रदेशात (MP Election) राज्यसभेच्या 3 जागांसाठी निवडणूक होत आहे. यापैकी दोन जागांवर संख्याबळाच्या आधारे भाजपचे उमेदवार सहजपणे निवडून येणार आहेत. मात्र, तिसऱ्या जागेवर उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपकडे पुरेसे संख्याबळ नव्हते. या तिसऱ्या जागेसाठी काँग्रेसने मिनाक्षी नटराजन (Meenakshi Natarajan) यांच्या रुपाने तगडा उमेदवार रिंगणात उतरवला होता. त्यामुळे मध्य प्रदेशातील राज्यसभेची तिसरी जागा काँग्रेस जिंकेल, अशी आशा होती. मात्र, गेल्या काही तासांमध्ये मध्य प्रदेशात घडलेल्या घडामोडींमुळे तिन्ही जागांवर भाजपचे उमेदवार विजयी ठरताना दिसत आहेत. काँग्रेसला मध्य प्रदेशातील राज्यसभेच्या एकमेव जागेवर मिनाक्षी नटराजन निवडून येतील, अशा ठाम विश्वास होता. निवडणुकीत क्रॉस व्होटिंग टाळण्यासाठी काँग्रेसने आपल्या आमदारांना खास विमानाने बंगळुरुला मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्या रिसॉर्टमध्ये न्यायचा प्लॅन आखला होता. त्यासाठी काँग्रेस आमदार विमानाने निघणारही होते. मात्र, त्याच्या काही वेळ आधीच मिनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्जच निवडणूक आयोगाने बाद ठरवल्याची बातमी समोर आली. परिणामी मध्य प्रदेशात भाजपच्या तीन उमेदवारांचा राज्यसभेवर जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे साहजिकच काँग्रेसच्या गोटात मोठी खळबळ उडाली. (Rajya Sabha Election 2026)

Continues below advertisement

मिनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरवल्यामुळे मध्य प्रदेशात प्रचंड मोठा राजकीय गदारोळ निर्माण झाला आहे. भाजप नेत्यांना मिनाक्षी नटराजन यांच्या उमेदवारी अर्ज बाद होण्याला 'सत्याचा विजय' म्हटले आहे, तर काँग्रेसने याला 'सीट चोरी' असे म्हटले आहे. मिनाक्षी नटराजन यांनी आपला उमेदवारी अर्ज भरताना त्यांच्याविरुद्ध सुरु असलेल्या एका कायदेशीर प्रकरणाचा उल्लेख प्रतिज्ञापत्रात केला नव्हता. हाच धागा पकडत मिनाक्षी नटराजन यांचे शपथपत्र अपूर्ण असल्याचे कारण पुढे करत मध्य प्रदेशातील राज्यसभा निवडणुकीतील रिटर्निंग ऑफिसर अरविंद शर्मा यांनी त्यांचा उमेदवारी अर्जच बाद ठरवला. भाजपने यासाठी मिनाक्षी नटराजन यांच्याविरुद्ध निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत तथ्य आढळले आहे. मिनाक्षी नटराजन यांनी या प्रकरणात न्यायालयात आपले लेखी म्हणणे दाखल केले होते. त्यामुळे त्यांना या कायदेशीर प्रकरणाची पूर्ण माहिती असल्याचे सिद्ध होते. तरीही मिनाक्षी नटराजन यांनी राज्यसभेच्या उमेदवारी अर्जात ही बाब नमूद न केल्याने निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार "अपूर्ण प्रतिज्ञापत्राचा फॉर्म 26 सादर करणे आणि उमेदवाराने तथ्ये लपवणे" हे त्यांच्यावरील आरोप सिद्ध झाले आहेत. परिणामी त्यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरवल्याची भूमिका रिटर्निंग ऑफिसर अरविंद शर्मा यांनी मांडली आहे. 

याविरोधात काँग्रेसचे मध्य प्रदेशातील नेते प्रचंड आक्रमक झाले आहेत. मिनाक्षी नटराजन यांचा राज्यसभेचा उमेदवारी अर्ज बाद ठरवण्याच्याविरोधात काँग्रेसने न्यायालयात धाव घेतली आहे. मंगळवारी रात्री ही गोष्ट समोर आल्यानंतर काँग्रेस नेते जयराम रमेश, भूपेश बघेल, सचिन पायलट आणि केसी वेणुगोपाल यांच्यासह अनेक नेते नवी दिल्लीत निवडणूक आयोगाच्या कार्यालयात गेले होते. त्याठिकाणी धरणे आंदोलन केल्यानंतर काँग्रेस पक्षाचे निवदेन निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्याने स्वीकारले. निवडणूक आयोगाने मिनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरवताना दिलेले कारण घटनाबाह्य आहे. ज्या नोटिशीचा उल्लेख केला जात आहे ती भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) कलम 223(1) अंतर्गत जारी करण्यात आली होती. न्यायालयाने अजून प्रकरणाची माहिती घेतली नव्हती आणि कोणतेही समन्स जारी झाले नव्हते, त्यामुळे याला प्रलंबित गुन्ह्याचे प्रकरण मानता येत नाही. आणि कारण हे प्रलंबित प्रकरण नाही, त्यामुळे कायद्यानुसार याचा उल्लेख करणे बंधनकारक नाही, असा युक्तिवाद काँग्रेसकडून करण्यता आला आहे.

Continues below advertisement

Meenakshi Natarajan news: राज्यसभेचा उमेदवारी अर्ज बाद झाल्यानंतर मिनाक्षी नटराजन काय म्हणाल्या?

जेव्हा भाजपने जिंकण्यासाठी मध्य प्रदेश विधानसभेमध्ये आवश्यक (58) मते नसतानाही तिसरा उमेदवार उभा केला, तेव्हाच स्पष्ट झाले होते की हा एक कट आहे आणि भाजप सीट चोरी करू इच्छिते. सुरुवातीला त्यांनी एक उमेदवार दिला. पण जेव्हा त्यांना समजले की आम्ही सर्व एकत्र आहोत आणि कोणताही फूट पडणार नाही म्हणजे त्यांचा तिसरा उमेदवार जिंकणार नाही तेव्हा त्यांनी एका नोटिशीचा आधार घेतला. या प्रकरणात अजून कोणत्याही न्यायालयाने दखल घेतलेली नाही, तरीही नामांकन रद्द करण्यात आले. ही फक्त माझ्या राज्यसभा उमेदवारीची बाब नसून देशासमोरील गंभीर प्रश्न आहे. असाने भारताची लोकशाही टिकेल का?, असा प्रश्न मिनाक्षी नटराजन यांनी उपस्थित केला.

आणखी वाचा

Amravati Vidhan Parishad Election 2026: अमरावती विधानपरिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट, काँग्रेसचा उमेदवार गायब झाल्याची चर्चा अन् आता थेट रुग्णालयात... नेमकं काय घडलं?