Raju Patil on Raj Thackeray: कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीनंतर (KDMC Election) मनसेच्या (MNS) नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला (Shiv Sena Shide Faction) पाठिंबा दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मुंबईतील षन्मुखानंद सभागृहात झालेल्या कार्यक्रमात सध्याच्या राजकारणावर, विशेषतः कल्याण डोंबिवलीमध्ये सुरू असलेल्या फोडाफोडीच्या राजकारणावर आपली तीव्र नाराजी व्यक्त केली होती. "कल्याण-डोंबिवलीत जे सुरू आहे त्याची शिसारी आली, नुसता बाजार मांडलाय," असे राज ठाकरे यांनी म्हटले होते. आता मनसेचे माजी आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी शिंदेसेनेशी केलेल्या युतीमागची भूमिका स्पष्ट करत, ही युती सत्तेसाठी नव्हे तर मनसेचे नगरसेवक वाचवण्यासाठी केल्याचा दावा केला आहे.

राजू पाटील म्हणाले, मनसेच्या नगरसेवकांना सातत्याने भाजपकडून फोन येत आहेत. फोडाफोडीचं राजकारण खुलेआम सुरू आहे. त्यामुळे आमचे नगरसेवक फुटू नयेत, पक्ष टिकून राहावा यासाठीच आम्हाला शिंदेसेनेशी युती करावी लागली, असं त्यांनी स्पष्ट केलं.

Raju Patil on Raj Thackeray: ‘फक्त पाठिंबा दिला, सत्तेत गेलो नाही’

शिंदेसेनेशी केलेली युती स्वार्थासाठी नसून पक्षहितासाठी असल्याचं सांगताना राजू पाटील म्हणाले, “आम्ही शिंदेसेनेला फक्त पाठिंबा दिला आहे. त्यांच्या सत्तेत सहभागी झालेलो नाही. सत्तेत जायचं असेल तर स्वतंत्र गट स्थापन करावा लागतो. तसं काहीही केलं नाही. माझ्या नगरसेवकांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांच्या राजकीय भवितव्याची काळजी घेणं ही माझी जबाबदारी आहे.” या निर्णयाबाबत पक्षप्रमुख राज ठाकरे यांना आधीच कल्पना देण्यात आली होती, असंही त्यांनी स्पष्ट केलं. तसेच, “भाजपला मनसेविषयी बोलण्याचा नैतिक अधिकार नाही,” असा टोलाही त्यांनी लगावला.

Raju Patil on Raj Thackeray: ‘कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा’

राजू पाटील यांनी नाव न घेता भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावरही जोरदार टीका केली. “राजकारणात संधी प्रत्येकालाच मिळते. पण कोणी मित्र असल्याचं सांगत शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, महिला अध्यक्ष फोडत असेल, एक पक्ष सातत्याने माझा पक्ष फोडण्याचं काम करत असेल तर ते ओळखण्यासाठी मी बालबुद्धीचा नाही. कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा,” अशा शब्दांत त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला.

Raju Patil on Raj Thackeray: राज ठाकरे नेमकं काय म्हणाले होते?

बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त षण्मुखानंद सभागृहात आयोजित कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे यांनी कल्याण–डोंबिवलीसह राज्यातील राजकीय परिस्थितीवर तीव्र संताप व्यक्त केला होता. “आज देशात आणि महाराष्ट्रात गुलामांचा बाजार भरला आहे. मुंबईसह कल्याण–डोंबिवली आणि इतर ठिकाणचा हा बाजार पाहून अक्षरशः शिसारी येते. हे सगळं चित्र पाहिल्यानंतर मला वाटतंय, बाळासाहेब नाहीत ते बरं झालं. ते असते तर हे पाहून किती व्यथित झाले असते?” अशा शब्दांत त्यांनी राजकीय फोडाफोडीवर प्रखर टीका केली होती.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा

Shivsena BJP Dharashiv ZP Election 2026: मोठी बातमी: धाराशिवमध्ये एकनाथ शिंदेंची शिवसेना भाजपकडून हायजॅक? भाजप आमदारानेच शिवसैनिकांना एबी फॉर्म वाटल्याने खळबळ