Raju Khare NCP: शरद पवार गटाच्या नेत्याकडून पेपरात अजितदादांच्या 'घड्याळा'ची जाहिरात; पेपर वाचताच पक्षात खळबळ माजली
Raju Khare NCP: शरद पवार गटाच्या नेत्याने दैनिकांमध्ये दिलेल्या जाहिरातीत अजित पवार गटाच्या घड्याळ चिन्हाचा वापर करण्यात आला आहे. यामुळे राष्ट्रवादीत एकच खळबळ उडाली आहे.

Raju Khare : शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मोहोळचे आमदार राजू खरे (Raju Khare) हे पुन्हा एकदा पक्षविरोधी भूमिकेमुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी नुकतीच स्थानिक दैनिकांमध्ये दिलेल्या एका जाहिरातीत पक्षाचे अधिकृत चिन्ह 'तुतारी' ऐवजी अजित पवार गटाच्या 'घड्याळ' चिन्हाचा वापर केलाय. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
राजू खरे यांनी या जाहिरातीत अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नूतन जिल्हाध्यक्ष उमेश पाटील (Umesh Patil) यांचे अभिनंदन केले आहे. त्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे फोटो वापरण्यात आले आहेत.
जाहिरातीत अजितदादांच्या राष्ट्रवादीचं घड्याळ झळकलं
यापूर्वी देखील राजू खरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी स्थानिक दैनिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जाहिराती दिल्या होत्या. राजू खरे यांनी शिवजयंतीनिमित्त शिंदे सेनेचे भरत गोगावले यांना कार्यक्रमाला बोलावले होते. यानिमित्त ठिकठिकाणी लागलेल्या फ्लेक्सवरून शरद पवार आणि त्यांची तुतारी गायब झाली होती. तर त्या जागी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भरत गोगावले यांचे फोटो झळकले होते. यानंतर आता पुन्हा एकदा राजू खरे यांच्याकडून स्थानिक दैनिकांना दिलेल्या जाहिरातीत पक्षाचे चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस ऐवजी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हाचा वापर करण्यात आला आहे. राजू खरे यांच्या पक्षविरोधी कृतींमुळे आता शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांच्या विरोधात शिस्त भंगाची कारवाई करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
राजू खरेंची राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला दांडी
दरम्यान, 10 जून रोजी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचा 26 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यापासून ते खासदार नीलेश लंके यांच्यापर्यंत अनेक दिग्गज नेत्यांनी या कार्यक्रमात हजेरी लावून व्यासपीठ गाजवले. राज्यभरातील आमदार, खासदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने पुण्यात जमले होते. मात्र, वर्धापन दिन कार्यक्रमाला आमदार राजू खरे गैरहजर राहिले होते, ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. तर याआधी काही महिन्यांपूर्वी सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार खरे यांनी, "माझ्या हातात चुकून तुतारी आली," असे वक्तव्य करूनही खळबळ उडवून दिली होती.
आणखी वाचा
























