Rajabhau Waje on Operation Tiger: शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena UBT) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी 'मातोश्री' (Matoshree) निवासस्थानी ठाकरे गटाच्या खासदारांची (MPs) एक अत्यंत महत्त्वाची बैठक बोलावली आहे. उद्या 14 जून रोजी ही बैठक पार पडणार असून, या बैठकीमुळे राज्यातील राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे. 'ऑपरेशन टायगर'च्या (Operation Tiger) पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी ही बैठक बोलावल्याची माहिती समोर येत आहे. आगामी राजकीय घडामोडी आणि पक्षांतर्गत रणनीती ठरवण्यासाठी सर्व खासदारांना मुंबईत पोहोचण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या आगामी बैठकीबाबत ठाकरे गटाचे नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांनी आपली प्रतिक्रिया (Reaction) दिली आहे. "मी ठाकरेंची साथ सोडणार नाही. त्रेतायुगात असतो तर छाती फाडून दाखवली असती," अशा ठाम शब्दांत त्यांनी आपली निष्ठा व्यक्त केली आहे.

Rajabhau Waje on Operation Tiger: 'ऑपरेशन टायगर'वर राजाभाऊ वाजे काय म्हणाले?

राजाभाऊ वाजे 'एबीपी माझा'शी बोलताना म्हणाले, "मला बैठकीचा निरोप आला आहे, परंतु मला असे वाटत नाही की 'ऑपरेशन टायगर'च्या निमित्ताने ही बैठक आहे. ही नेहमीप्रमाणे होणारी बैठक आहे. मला निरोप आला आहे आणि मी बैठकीला जाणार आहे."

Rajabhau Waje on Operation Tiger: "मी त्रेता युगात असतो तर छाती फाडून दाखवली असती"

ठाकरे गटाचे अनेक खासदार शिंदे सेनेच्या संपर्कात असल्याचा दावा सत्ताधारी गटाकडून केला जात आहे. या संभाव्य यादीत आपलेही नाव चर्चेत असल्याबाबत विचारले असता राजाभाऊ वाजे म्हणाले, "मी आधी देखील सांगितले आहे आणि आजही पुन्हा सांगतो की माझ्यापर्यंत कोणाचा निरोप आलेला नाही आणि माझ्यापर्यंत कोणी आले देखील नाही. माझा कुठेही जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मी त्रेता युगात असतो तर मी छाती फाडून दाखवली असती, मात्र हे युग कलियुग आहे, त्यामुळे मला छाती फाडून दाखवता येत नाही. संशय घेण्याचे काहीही कारण नाही, मी कुठेही जाणार नाही. मी जिथे आहे तिथे आनंदात आहे. मी विधानसभेचा सदस्य शिवसेनेमुळे झालो, लोकसभेचा सदस्य देखील शिवसेनेमुळे झालो. त्यामुळे मी उद्धव साहेबांना सोडून कुठेही जाणार नाही. ही काळया दगडावरची रेघ आहे," असे त्यांनी ठणकावून सांगितले.

Rajabhau Waje on Operation Tiger: विकासकामांवरून पक्षांतराच्या चर्चा फेटाळल्या

विकासकामांमध्ये विरोधकांना अडचणी येत आहेत, सत्ताधारी पक्ष विश्वासात घेत नाही, अशी नाराजी तुम्ही व्यक्त केली होती. त्यामुळे असा निर्णय घ्यावा लागतोय का? अशा रंगणाऱ्या चर्चांवर वाजेंनी स्पष्ट भूमिका मांडली. ते म्हणाले, "विकासकामे ही कोणी वैयक्तिकरीत्या करत नाही. शासनाच्या निधीतून विकासकामे होत असतात. त्यामुळे मी केले किंवा कोणीही केले, तरी ते शासनानेच केलेले असते. विकासकामांमुळे आपण इकडे-तिकडे जावे असे मला वाटत नाही. लोकांनी आपल्याला एका विचारधारेसाठी मतदान केलेले आहे. आपण लोकांची भावना लक्षात घेऊन आपण जिथे आहोत तिथेच राहिले पाहिजे, अशी माझी भावना आहे. कामे आज होतील, उद्या होणार नाहीत, या गोष्टी सुरूच राहतील. परंतु, आपली विचारधारा बदलून काही करणे योग्य नाही, त्यामुळे मी असा कोणताही निर्णय घेणार नाही," असे देखील त्यांनी म्हटले.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

Ambadas Danve : ठाकरेंचे खासदार एकनाथ शिंदेंचा संपर्कात असल्याचा चर्चेला अंबादास दानवेंचा दुजोरा; म्हणाले, 'आता हे अधिकृत कबूल करायला हवं...'