Raj Thackeray Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता एकत्रच राहायचंय', पण राज ठाकरेंची सावध भूमिका, ठाकरे गट-मनसे युतीबाबत अजूनही साशंकता
Raj Thackeray Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी 'एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठी' असे विजयी मेळाव्यात जाहीर केले. मात्र दुसरीकडे राज ठाकरे यांनी सावध भूमिका घेतल्याचे दिसून आले.

Raj Thackeray Uddhav Thackeray : त्रिभाषा सूत्रानुसार राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीने शिकवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. या निर्णयाला शिवसेना (ठाकरे गट), महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि इतर विरोधी पक्षांनी तीव्र विरोध दर्शवला. अखेर मराठी भाषेवरील प्रेम आणि जनआंदोलनाच्या दबावामुळे फडणवीस सरकारला नमते घ्यावे लागले आणि हिंदी सक्तीचा शासन निर्णय मागे घेण्यात आला. यानंतर मराठी भाषेच्या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा एकत्र विजयी मेळावा पार पडला. या विजयी मेळाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही पक्षाचा झेंडा नव्हता, परंतु अजेंडा मात्र एकच होता तो म्हणजे मराठी. तब्बल वीस वर्षांनंतर ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर आले. यानंतर मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. उद्धव ठाकरे यांनी 'एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठी' असे विजयी मेळाव्यात जाहीर केले. मात्र दुसरीकडे राज ठाकरे यांनी सावध भूमिका घेतली. त्यामुळे ठाकरे गट-मनसे युतीबाबत (Shiv Sena MNS alliance) अजूनही साशंकता असल्याचे दिसून येते.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सोबत घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांची तीव्र इच्छा असल्याचे संकेत त्यांच्या विजय मेळाव्यातील भाषणातून तीन-चार वेळा स्पष्टपणे जाणवले. मात्र, राज ठाकरे यांनी या संदर्भात सावध भूमिका घेतली आणि त्यावर फार काही भाष्य टाळले.
आम्ही एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठी : उद्धव ठाकरे
राज यांच्या भाषणात उद्धव ठाकरे यांचे थेट कौतुक नव्हते, तरी त्यांनी विषयांची प्रभावी मांडणी केली. त्यांच्या भाषणानंतर खुद्द उद्धव ठाकरे म्हणाले, “राजने इतकी चांगली मांडणी केली की आता माझ्या भाषणाची गरज उरत नाही.” तसेच, “त्याचे कर्तृत्व सर्वांनी पाहिले आहे,” असे म्हणत त्यांनी लहान भावाचे अप्रत्यक्षपणे कौतुक केले. "आम्ही एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठी," असे उद्धव ठाकरे यांनी ठामपणे सांगितले.
राज ठाकरे यांची भूमिका निर्णायक ठरणार
तर राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात, "मराठी माणसांची एकजूट व्हावी आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण व्हावे," असे भावनिक आवाहन केले, पण भविष्यात युती कायम राहील, याबाबत कोणताही स्पष्ट संकेत दिला नाही. त्यामुळे युतीसाठी उद्धव ठाकरे यांनी हात पुढे केले असले तरी राज ठाकरे यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. आता मराठीच्या मुद्द्यावरून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे वीस वर्षांनी एकत्र आले असले तरी मनसे आणि ठाकरे गटाची युती होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आणखी वाचा


















