Raj Thackeray Uddhav Thackeray Shivaji Park Sabha: नाशिकनंतर ठाकरे बंधूंची तोफ आज मुंबईत धडकणार आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची आज शिवाजी पार्कवर संयुक्त सभा (Raj Thackeray Uddhav Thackeray Shivaji Park Sabha) होणार आहे. राज ठाकरे यांनी शिवसेना पक्ष सोडल्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे 20 वर्षानंतर एकत्र शिवाजी पार्कवर संयुक्त सभा घेणार आहेत. त्यामुळे शिवसैनिक आणि मनसैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या या भव्य सभेमध्ये मुंबई महापालिका निवडणुकीच्या (Mumbai Municipal Corporation Election 2026) पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू मराठी मतदारांना आणि मुंबईकरांना नेमकी काय साद घालतात? राज ठाकरेंचा पुन्हा "लाव रे तो व्हिडीओ" दिसणार का? याकडे विशेष लक्ष असेल. मोठे शक्ती प्रदर्शन या सभेच्या माध्यमातून ठाकरे बंधू करणार असून, शिवाजी पार्कवर राज ठाकरे, उद्धव ठाकरे काय बोलणार? याची उत्सुक्ता असेल. (BMC Election 2026)
इंजिनमध्ये बसून मुंबईतील विरोधकांना मशालीने जाळून टाकू- राज ठाकरे
मुंबईतील संयुक्त सभेआधी शाखाभेटीदरम्यान राज ठाकरेंनी सगळ्यांना महत्वाचं आवाहन केलं. शिवतीर्थावर या...इंजिनमध्ये बसून मुंबईतील विरोधकांना मशालीने जाळून टाकू असं राज ठाकरे म्हणाले. काल राज ठाकरे मुंबईतीलविविध शाखांना भेटी देत होते त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
ठाण्यातही उद्या ठाकरे बंधूंची संयुक्त सभा- (Raj Thackeray Uddhav Thackeray Thane)
ठाकरे बंधू मुंबईनंतर ठाण्यात संयुक्त सभा घेणार आहेत. 12 जानेवारीला ठाकरे बंधू ठाण्यात सभा घेणार आहेत. त्याआधी ठाकरे बंधूंची ज्या ठिकाणी सभा होणार आहे त्याभागात एकनाथ शिंदे आज प्रतार रॅली काढणार आहेत. ठाण्यातील विविध भागात एकनाथ शिंदे आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी फिरणार आहेत. तर संध्याकाळी भाईंदर पूर्वेत शिंदेंची सभा होणार आहे. दरम्यान, 15 जानेवारीला राज्यातील 29 महापालिकांसाठी मतदान होणार आहे. तर 16 जानेवारीला मतमोजणी होईल.