Raj Thackeray-Uddhav Thackeray Mumbai Morcha मोठी बातमी: राज ठाकरे की उद्धव ठाकरे, 5 जुलैच्या मोर्चाचं नेतृत्व कोण करणार?, संजय राऊतांनी नाव सांगून टाकलं!
Raj Thackeray-Uddhav Thackeray Mumbai Morcha: मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे एकत्रित मोर्चा काढणार आहेत. या मोर्चात कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा नसणार आहे.

Raj Thackeray-Uddhav Thackeray Mumbai Morcha: हिंदीच्या मुद्द्यांवरुन मुंबईत 5 जुलै रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एकत्रित मोर्चा काढणार आहेत. या मोर्चात कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा नसणार आहे. तब्बल 20 वर्षांनी ठाकरे बंधू एकत्रितपणे आंदोलन करत असल्यामुळे या मोर्चाचं नेतृत्व कोण करणार?, राज ठाकरे की उद्धव ठाकरे?, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्यातच आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महत्वाची माहिती दिली आहे.
संजय राऊत आज (28 जून) माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, काल माझं शरद पवार यांच्यासोबत देखील बोलणं झालं आहे. त्यांच्या पक्षाने देखील 5 जुलैच्या मोर्चाला पूर्ण ताकदीने पाठिंबा दिला आहे. काँग्रेस देखाील हिंदी सक्तीच्याविरोधात आहे. मला खात्री आहे, काँग्रेसदेखील या ऐतिहासिक मोर्चाला पाठिंबा देईल, असं संजय राऊत म्हणाले. अनेक छोटे पक्ष देखील मोर्चात सहभागी होतील, असं संजय राऊत म्हणाले.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मोर्चाचं नेतृत्व करणार-
दोघे ठाकरे बंधू मोर्चासाठी एकत्र येतायत याचा सगळ्यांना आनंद आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येऊन मोर्चाचं नेतृत्व करतील, असंही संजय राऊतांनी सांगितले. मुंबईवर मराठी माणसांचा झेंडा फडकवायचा असेल तर बाळासाहेबांचे विचार पाळावे लागतील. मराठी शक्तींनी एकत्र यावं, असं आवाहन संजय राऊतांनी केलं. तसेच याआधी मनसे-शिवसेना नेते एकमेकांना भेटत नव्हते. रस्ते बदलायचे. आता मराठीसाठी एकत्र येतायत, असंही संजय राऊतांनी सांगितले.
मुंबई पालिका निवडणुकीत मराठी शक्तींनी एकत्र लढावं- संजय राऊत
मुंबई पालिका निवडणुकीत मराठी शक्तींनी एकत्र लढावं, आमची इच्छा आहे. मोर्चामुळे मराठी माणसाच्या मनात चांगलं वातावरण तयार होईल. मराठी माणसांची एकी तुटणार नाही, हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समजून घ्यावं, असं संजय राऊत म्हणाले. ठाकरेंनी कोणताही जीआर काढला नव्हता, फडणवीस सरकारने काढलाय, असंही संजय राऊतांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लादलंय, असा आरोप संजय राऊतांनी केला. उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तोंड शिवून बसलेत, असा घणाघात देखील संजय राऊतांनी केला.
























