Raj Thackeray Uddhav Thackeray Mumbai Morcha: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार (ECI Gyanesh Kumar) यांच्या विरोधात मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज मुंबईत गर्जना मोर्चा काढला. ठाकरे बंधूंच्या या मोर्चाला मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि राज्यातील इतर विरोधी पक्षाने देखील ठाकरे बंधूंच्या या गर्जना मोर्चाला उपस्थित राहत पाठिंबा दिला. मेट्रो सिनेमा ते मुंबई महापालिका मुख्यालयापर्यंत ठाकरे बंधूंनी मोर्चा काढला. त्यानंतर राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर हल्लाबोल करत विविध मुद्द्यांवर भाष्य केले. (Raj Thackeray Uddhav Thackeray Mumbai Morcha)
गर्जना मोर्चातून राज ठाकरे काय काय म्हणाले? (Raj Thackeray Uddhav Thackeray Mumbai Morcha)
देशभरात मतचोरीमुळे वातावरण तापलंय. मी 2017 पासून सांगतोय, की मतचोरी सुरु आहे. त्यादरम्यान, मी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, तृणमृल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांना भेटलो होतो. मी सतत सांगत होतो. मतांमध्ये चोरी होत आहे. त्यावेळी मी निवडणुकांवर बहिष्कार टाका, असं म्हणत होतो, असं राज ठाकरे म्हणाले. मत अशी कमी होऊ शकत नाही. या ठिकाणी सर्व बसलेले नेते देखील त्यावेळी होते, असं राज ठाकरेंनी सांगितले. 2024 च्या निवडणुकीत संपूर्ण बहुमत महायुतीला मिळालं, पण महाराष्ट्रात जल्लोष नाही. लोकांमध्ये उत्साह नाही, जल्लोष नाही. संपूर्ण सन्नाटा होता, मग हा कोणता विजय? 40 ते 60 लाख मतदार वाढवले गेले. लोकसभा आणि विधानसभेत 1 कोटी मत वाढली. तुमची इतकी मत वाढली आता सगळ्या गोष्टी उघड झाल्या.
आपण या देशाचा ढाचा बदलत आहोत- राज ठाकरे (Raj Thackeray On ECI)
एकाच उद्योगपतींना जंगलं, प्रकल्प, बंदरे दिले जात आहेत. सरकारचा मनमानी कारभार सुरु आहे. निवडणूक आयोग जर आमच्या बरोबर असेल तर आम्ही कसे ही निवडून येऊ...या देशाची आर्थिक स्थिती बरबाद करू...अमेरिकेला सरेंडर होऊ..तुम्हाला रांगेत उभे करू...पेट्रोल इंधनाचे भाव वाढवू...कोणतीही भीती यांना दिसत नाही आहे. काँग्रेसच्या काळात ही अनेक उद्योगपती होते. पण यांच्या काळात एकच उद्योगपती..अशी टीका राज ठाकरेंनी केली. सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, निवडणूक आयोग सगळे ताब्यात घ्यायचे. आपण या देशाचा ढाचा बदलत आहोत. या सगळ्याच्या विरोधात हा मोर्चा आहे, असं राज ठाकरेंनी ठणकावले.
माझ्या फक्त 2 मागण्या...दूध का दूध आणि पानी का पानी होईल; राज ठाकरे काय म्हणाले? (Raj Thackeray On SIR)
विधानसभेच्या वेळेला मतदार वाढवायचे आणि त्यातून सत्ता घ्यायची आणि SIR मधून दोन कोटी मतदार वगळायचे. हे कोण लोक आहेत?, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. माजी केंद्रीय गृहसचिव आर के सिंह यांच्या मते SIR अपवादात्मक परिस्थितीत करता येते. देशात एकाचवेळी Intensive revision करणं बेकायदेशीर आहे. याची कायद्यातच तरतूद नाही, असंही राज ठाकरे म्हणाले. तसेच माझ्या फक्त दोनच मागण्या आहेत. त्यातील पहिली म्हणजे महाराष्ट्रात जो एसआयआर झाला, तो रद्द करावा. तसेच दुसरी मागणी म्हणजे यापुढे बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या पाहिजे. यामुळे दूध का दूध आणि पानी का पानी होईल, असं राज ठाकरे म्हणाले. तसेच माझी सर्व राजकीय पक्षांना विनंती आहे की, दिल्लीत जाऊन बोला. उद्या कोणाची सत्ता येऊ दे... काही फरक पडत नाही. पण सत्ता योग्य मार्गाने आली पाहिजे, असं राज ठाकरे म्हणाले.
