Raj Thackeray-Uddhav Thackeray Morcha: राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंचा मोर्चा कुठून कुठपर्यंत?; दिनांक, ठिकाण अन् वेळ; ठाकरे बंधूंच्या मोर्चाची A टू Z माहिती
Raj Thackeray-Uddhav Thackeray Morcha: हिंदीसक्ती आणि त्रिभाषा सूत्र विरोधात ठाकरे बंधू सरकारविरोधात मैदानात उतरले आहेत. हिंदी सक्तीविरोधात 5 जुलैला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मोर्चा काढणार आहेत.

Raj Thackeray-Uddhav Thackeray मुंबई: हिंदीसक्ती आणि त्रिभाषा सूत्र विरोधात ठाकरे बंधू सरकारविरोधात मैदानात उतरले आहेत. हिंदी सक्तीविरोधात 5 जुलैला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) हे एकत्रित मोर्चा काढणार आहेत. मुंबईतील गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान, असा हा विराट मोर्चा असेल.
ठाकरे बंधूंचा मोर्चा निघण्यावर शिक्कामोर्तब कसं झालं? याची इनसाईड स्टोरी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांना सांगितली. काल (26 जून) राज ठाकरेंनी आपल्याला फोन केला असा दावा संजय राऊत यांनी केला. मराठी माणसांचे दोन मोर्चे निघणं योग्य दिसत नाही, असं राज यांनी फोनवर म्हटलं. त्यामुळे एकत्रित मोर्चा काढण्याबाबत दोन्ही बंधूंचं एकमत झाल्याची माहिती संजय राऊतांनी दिली आहे. तर 10 वाजताची वेळ सोयीची नसल्यानं वेळ आणि ठिकाणाबाबतचा निर्णय दोन्ही पक्ष मिळून ठरवतील, अशी माहिती देखील संजय राऊतांनी दिली. मोर्चात कुठलाही झेंडा नसेल तर केवळ अजेंडा असेल असा दुजोरा संजय राऊतांनी राज ठाकरेंच्या भूमिकेला दिला आहे. त्यामुळे राज ठाकरेंनी मोर्चाचा मार्ग ठरवला आणि आता मोर्चाची वेळ उद्धव ठाकरे ठरवणार आहे.
ठाकरे बंधूंच्या मोर्चाचा मार्ग कसा असेल?
दिनांक- 5 जुलै 2025
ठिकाण- दक्षिण मुंबईतील गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान
वेळ- मोर्चाची वेळ येत्या काही तासांत स्पष्ट होण्याची शक्यता.
मोर्चात कोण-कोण सहभागी होणार?
जूलैच्या मोर्चात कोणताही झेंडा नसेल तर मराठीचा अजेंडा असेल. मराठी माणूस या मोर्चाचं नेतृत्व करेल, असं राज ठाकरेंनी सांगितले. तसेच मोर्चात सर्वपक्षीयांसह सर्व साहित्यिक, कलाकार, तज्ज्ञ, विद्यार्थी आणि शिक्षकांनी देखील सहभागी व्हावं, असं आवाहन राज ठाकरेंकडून करण्यात आलं होतं. त्यामुळे अनेक मराठी कलाकार, साहित्यिक, शाळेतील शिक्षक, राजकीय नेते या मोर्चात सहभागी होतील.
सेना-मनसे युतीची पहिली झलक-
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या मुंबईतील मोर्चाआधी आज मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाई यांची भेट झाली. दादारमधील एका हॉटेलमध्ये दोघांनी मोर्चाबाबत कसं नियोजन करावं, याबाबत प्राथमिक चर्चा झाली. आम्ही याआधीही अनेकदा भेटलो आहोत, आज मोर्चाच्या निमित्ताने भेटलो आहोत, असं संदीप देशपांडे आणि वरुण सरदेसाई यांच्याकडून सांगण्यात आलं.
बाळा नांदगावकरांचा विजय वडेट्टीवार यांना फोन-
मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांना फोन केला. यावेळी मराठी भाषेसाठी मोर्च्यात सहभागी होण्याची विनंती बाळा नांदगावकर यांच्याकडून करण्यात आली. नांदगावकरांच्या या विनंतीवरुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि इतर नेत्यांबरोबर मोर्च्यात सहभागी होण्याबाबत निर्णय घेऊ, असं वडेट्टीवार यांनी सांगितले.
अजित पवार गटातील आमदार अमोट मिटकरींचाही पाठिंबा-
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी दोन्ही ठाकरे बंधूंच्या मराठीच्या मुद्द्यावरील एकत्रित मोर्चाचे स्वागत केलंय. मराठीविषयी जर पक्षविरीत मोर्चा निघत असेल तर त्याचं स्वागत केलं पाहिजे असे आमदार मिटकरी म्हणालेय. मोर्चाच्या दिवशी विधिमंडळाचे कामकाज नसेल तर आपण निश्चितच एक मराठी प्रेमी म्हणून सहभागी होऊ, असे आमदार अमोल मिटकरी म्हणालेय. दरम्यान शरद पवार यांनी या विषयावर मांडलेली भूमिका योग्य असल्याचं आमदार मिटकरी म्हणालेत.
























