Raj Thackeray on Inquilab zindabad: मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी ठाण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला संबोधित केले. राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात देशाचा जीडीपी, बेरोजगारी, धर्मांधता, मराठी-हिंदी वाद अशा विविध मुद्द्यांवरुन भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले. राज ठाकरे यांच्या या भाषणाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा आहे. मात्र, या भाषणानंतर घडलेला आणखी एक प्रसंग राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या आगामी राजकीय दिशा दाखवून देणारा ठरला. राज ठाकरे यांनी काल ठाण्यात साधारण पाऊस तास भाषण केले. या भाषणात राज ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवरुन सत्ताधाऱ्यांची पिसं काढली. हे भाषण संपल्यानंतर राज ठाकरे पोडिअमवरुन बाजूला झाले आणि स्टेजवरुन उतरण्यासाठी खाली जात होते. त्याचवेळी समोरुन मनसेचे काही कार्यकर्ते घोषणा देत होते. यापैकी एक घोषणा ऐकून राज ठाकरे गर्रकन मागे वळले. ते मागे वळून पुन्हा माईकच्या दिशेने निघाले. तेव्हा काहीवेळ मनसेचे नेते आणि कार्यकर्त्यांना नेमकं काय झालं, हेच समजत नव्हतं. आपल्या तोंडातून काही अद्वातद्वा शब्द बाहेर पडला की काय आणि आता राज ठाकरे माईकवरुन सर्वांदेखत कानउघडणी करणार की काय, अशी भीती काहींना वाटली. (Maharashtra Politics)
राज ठाकरे यांनी पुन्हा माईकचा ताबा घेतल्यानंतर त्यांच्या नेहमीच्या करड्या आणि रोखठोक आवाजाच कार्यकर्त्यांकडे पाहून विचारलं की, 'इन्कलाब जिंदाबाद कोण म्हटलं?' त्यावर साहजिकच समोरुन लगेच उत्तर आले नाही. तेव्हा राज ठाकरे म्हणाले की, इन्कलाब जिंदाबाद (Inquilab zindabad) ही घोषणा द्यायची बरं का... ही भगतसिंगांची घोषणा आहे.' एवढं सांगून राज ठाकरे पुन्हा माघारी वळले आणि निघून गेले. मात्र, हा प्रसंग अनेकांच्या मनात कोरला गेला. राज ठाकरे यांनी कालच्या भाषणात, 'देवावर श्रद्धा असू द्या, धर्माचा अभिमान असावा, पण धर्मांध होऊ नका', हा सल्ला आवर्जून दिला. भाजपकडून गेल्या काही काळात सातत्याने राष्ट्रीयत्त्वाच्या आणि राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर भर देत राजकारण केले जात आहे. काही दिवसांपूर्वीच संसदेत 'वंदे मातरम' या राष्ट्रीय गीतासंदर्भात महत्त्वाचा कायदा मंजूर करण्यात आला. भाजपने यासाठी आग्रही भूमिका घेतली होती. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील अत्यंत लोकप्रिय घोषणा ठरलेल्या 'इन्कलाब जिंदाबाद'चे महत्त्व मनसेच्या कार्यकर्त्यांच्या आवर्जून लक्षात आणून दिले. 'वंदे मातरम' इतकेच 'इन्कलाब जिंदाबाद' महत्त्वाचे आहे, असे सांगितले. त्यामुळे या प्रसंगाची सध्या राजकीय वर्तुळात बरीच चर्चा सुरु आहे.
आणखी वाचा
