Raj Thackeray BMC Election 2026: यंदाच्या मुंबई महानगरपालिकेच्या प्रचारात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघेही ताकदीने उतरले नाहीत, ते सभा घेत नाहीत, इतका संथगती कारभार करुन भाजपच्या(BJP) झंझावाती प्रचारासमोर त्यांचा कसा निभाव लागणार, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून रंगली होती. मात्र, राज आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवाजी पार्कमधील रविवारच्या सभेने हे सगळे आरोप आणि शंका-कुशंका एका फटक्यात पुसून टाकल्या. या सभेत राज ठाकरे यांनी मुंबईतून मराठी माणसाचे अस्तित्व नष्ट करण्यासाठी कशाप्रकारे पद्धतशीरपणे प्रयत्न सुरु आहेत, अशी मांडणी केली. यावेळी त्यांनी उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या समूहाला महाराष्ट्रात कशाप्रकारे प्रकल्प देण्यात आले आहेत, याचे प्रेझेंटेशन सादर केले. यावेळी राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी एक व्हिडिओ दाखवला. या व्हिडीओत एक नकाशा दाखवण्यात आला. यामधून 2014 ते 2025 या काळात अदानी समूहाला (Adani Group) सरकारकडून कशाप्रकारे मुंबईसह देशभरात अनेक प्रकल्प आणि जमिनी देण्यात आल्या, याचा गोषवारा राज ठाकरे यांनी सादर केला.
राज ठाकरे यांची सभेत व्हिडीओ दाखवून विरोधकांना उघडे पाडण्याची स्टाईल ही नवीन नाही. मात्र, यावेळी राज ठाकरे यांनी दाखवलेल्या व्हिडीओने उपस्थित श्रोत्यांवर मोठा प्रभाव टाकल्याचे दिसत होते. राज ठाकरे हे अदानी समूहाच्या 2014 ते 2025 या काळात वाढत गेलेल्या साम्राज्याचा नकाशा दाखवत होते. या व्हिडीओला धीरगंभीर असा बॅकग्राऊंड स्कोअर होता. त्यामुळे हा व्हिडीओ प्रचंड परिणामकारक ठरला. यानंतर राज ठाकरे यांनी एक-एक करुन मुंबई आणि महाराष्ट्रात अदानी समूहाला कशाप्रकारे जमिनी आणि प्रकल्प देण्यात आले, याची यादी वाचून दाखवली. राज ठाकरे हे सर्व बोलत असताना शिवाजी पार्कमध्ये जमलेला हजारोंचा जनसमुदाय एकचित्ताने सर्व ऐकत होता. यावेळी शिवाजी पार्कवर अक्षरश: चिडीचूप शांतता होती. Raj Thackeray speech: राज ठाकरेंनी मुंबईबाबत कोणती भीती व्यक्त केली? राज ठाकरे यांनी आपल्या कालच्या भाषणात भविष्यात मुंबईवर कब्जा करण्यासाठी कशाप्रकारे आखणी चालू आहे, अशी एकंदरित मांडणी केली. वाढवण बंदर हे गुजरातजवळ आहे. बुलेट ट्रेनचे केवळ एक स्टेशन गुजरातमध्ये बाकी मार्ग पालघर, ठाणे आणि मुंबई असा आहे. गुजरातमधून मुंबईत मोठ्याप्रमाणावर लोक आणून इथे त्यांचे मतदारसंघ बनवले जात आहेत. खासदारापासून ते नगरसेवक अशा सर्व ठिकाणी आपली माणसं बसवून त्यांना मुंबई हस्तगत करायची आहे, असा आरोप यावेळी राज ठाकरे यांनी केला. मला 2024 ते 2025 यादरम्यान एक व्यक्ती भेटली होती. त्या व्यक्तीने मला मुंबईत आगामी काळात होऊ घातलेल्या गोष्टी आणि आराखडा ऐकून आम्ही शोध घेतला. त्यावेळी लक्षात आले की, केंद्र आणि राज्य सरकारचा सर्व फोकस हा एमएमआरए रिजनवर आहे. वाढवण बंदर झालं, ती गरज होती, हे मी समजू शकतो. पण आता वाढवण बंदराच्या बाजूला एअरपोर्टही होत आहे. वाढवण विमानतळ कशासाठी बांधले जात आहे तर इथून मुंबईचा कार्गोचा सगळा भाग तिकडे शिफ्ट केला जाईल. यानंतर नवी मुंबई विमानतळ उभारण्यात आले आहे तिकडे सध्या मुंबईतून होत असलेली देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतूक शिफ्ट केली जाईल. सध्या मुंबई विमानतळाचा प्लॉट अदानींच्या ताब्यात आहे. वाढवण आणि नवी मुंबई विमानतळामुळे या विमानतळाची गरज संपुष्टात येईल. तसे झाली की धारावी आणि कलिना परिसराला लागून असलेला मुंबई विमानतळाचा प्लॉट अदानींना विकला जाईल. आपण हा सगळा परिसर गुगल मॅपवर पाहिल्यावर लक्षात येईल की, या भागात शिवाजी पार्कसारखी 50 ते 60 मैदान बसू शकतात. तोच प्लॉट राज्य सरकार विकायला काढणार आहे. मला 100 टक्के वाटते, सध्याच्या मुंबई विमानतळाच्या जागेची विक्री होईल, असे राज ठाकरे यांनी म्हटले.