Raj Thackeray Speech BMC Election 2026: मुंबई महानगरपालिका निवडणुकीत दुबार मतदान रोखण्यासाठी ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यंदा जोरदार तयारी केली आहे. या पार्श्वभूमीवर मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी रविवारी शिवाजी पार्कवरील सभेतील भाषणातून शिवसेना (Shivsena Thackeray Camp) आणि मनसेच्या (MNS) कार्यकर्त्यांना एक महत्त्वाचा आदेश दिला. माझं सगळ्यांना सांगणं आहे की, बेसावध राहू नका. ईव्हीएम मशीनवर लक्ष ठेवा. शिवसेना आणि मनसे दोन्ही पक्षांचे बीएलए सकाळी सहा वाजता मला मतदान केंद्रावर हवे आहेत. या सगळ्यांनी दुबार मतदारांबाबत सतर्क राहावे. अजिबात बेसावध राहू नका. एखादा दुबार मतदार तिकडे आला तर, सकाळी सात वाजता त्याला फोडून काढा, असे राज ठाकरे यांनी सांगितले. मी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना सांगतोय की, आता आपल्यात काहीच वाद नाही. आपण भांडत राहावे, हेच त्यांना वाटते. त्यांना जे हवं ते आपण द्यायचं नाही, आपल्याला हवं ते आपण घ्यायचं, असे राज ठाकरे यांनी सांगितले. (BMC Election 2026)
मी मराठी माणसाच्यादृष्टीने शेवटची निवडणूक आहे. आज जर चुकलात तर कायमचे मुकाल. आपली शहरं त्यांच्या ताब्यात गेली तर काही होऊ शकत नाही. या निवडणुकीत तुम्हा मतदारांना राज्यकर्त्यांचा माज उतरवायचा आहे. ही मुंबई मराठी माणसाच्या हातात राहिली पाहिजे, तुमच्या हातात राहिली पाहिजे. आजवर मराठा साम्राज्याने जो लढा दिला, तोच लढा आता आपल्याला मुंबई वाचवण्यासाठी द्यायचा आहे. ही मुंबई गुजरातला मिळून द्यायची नाही, असे राज ठाकरे यांनी म्हटले.
राज आणि उद्धव ठाकरे यांच्या दोन्ही पक्षांनी यंदा दुबार मतदारांना शोधण्यासाठी निवडणुकीच्या आधीपासूनच मोहीम हाती घेतली आहे. निवडणूक आयोगाकडून मतदार याद्या मिळाल्यानंतर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन तपासणी करण्यात आली आहे. ज्या पत्त्यावर मतदार सापडले नाहीत, त्यांच्या नावासमोर लाल रंगाची खूण केली आहे. जेणेकरुन मतदानाच्या दिवशी हा बोगस मतदार मतदान केंद्रावर आल्यास त्याला पकडणे सोपे जाईल. मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी याबाबत माहिती देताना सांगितले आहे की, आम्ही मतदान केंद्रावरील आमच्या बीएलओंना सूचना दिल्या आहेत. मतदार यादीत लाल रंगाचे निशाण असलेला मतदार आला की, बाहेर 'गोंद्या आला रे आला', असा मेसेज द्या. दुबार मतदार दोन पायांवर चालत येईल, पण परत जाताना स्ट्रेचरवरुन जाईल, असा इशारा अविनाश जाधव यांनी दिला.
आणखी वाचा