Raj Thackeray on Ladki Bahin Yojana: राज्य सरकार हे लोकांना जातीधर्माच्या नावाखाली भुलवून मते मिळवत आहे. सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) आणली. या योजनंतर्गत प्रत्येक महिन्याला महिलांना 1500 रुपये दिले जात आहेत. पण महागाई किती वाढली आहे. 1500 रुपये फक्त 15 दिवसांत संपतात. घरगुती गॅस सिलेंडर (Gas Cylinder) आता 1000 रुपयांना मिळतो. मग अशावेळी फक्त 1500 रुपये कसे टिकणार, असा सवाल विचारत राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी लाडकी बहीण योजनेच्या मर्यादा स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. अशा योजनांमुळे तुमच्या भावी पिढ्यांचे आयुष्य बरबाद करु नका, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची शुक्रवारी नाशिकमध्ये सभा पार पडली. यावेळी राज ठाकरे यांनी त्यांच्या आक्रमक शैलीत महायुती सरकारवर निशाणा साधला.

राज ठाकरे यांनी लाडकी बहीण योजनेच्या पैशांना भुलून महायुतीला मतदान करणे कसे घातक आहे, हे मतदारांना पटवून देण्याचा प्रयत्न केला. तुमच्या पुढच्या पिढ्या नंतर म्हणतील, आमच्या भवितव्याचा विचार कोणी केला नाही. आमचं शहर तसंच राहिलं, त्याचा विकास झाल नाही. आमचा बाप विकला गेला, आईने पैसे घेतले, त्यामुळे आमचं भविष्य चांगलं घडलं नाही, अशी तुमची मुलं म्हणतील. जर असे व्हायला नको असेल तर मनसे-शिवसेनेच्या नगरसेवकांना निवडून द्या, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार वर्षे पुढे का गेल्या, याचे उत्तर सत्ताधाऱ्यांनी द्यायला हवे असे सांगत 1952 साली जन्माला आलेल्या पक्षाला 2026 मध्येही दुसऱ्याची पोरे दत्तक घ्यायला लागतात, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात भाजपची खिल्ली उडवली.

आपल्या भाषणात राज ठाकरे यांनी तपोवनातील वृक्षतोडीवरुन भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनाही लक्ष्य केले. पूर्वीचा लाकूडतोड्या बरा होता. त्याला देवीने विचारले सोन्याची, चांदीची कुऱ्हाड होती का? त्यालाही तो भाळला नाही. पण यांनी तपोवनातील झाडं छाटायच्या आधी पक्षातील लोकं, कार्यकर्ते छाटली आणि आता बाहेरून लोक आणली जातात. निवडणुकीच्या काळात नाशिकमध्ये देवेंद्र फडणवीस आले आणि त्यांनी नाशिकला दत्तक घेतो असं सांगितलं. त्यांच्या सांगण्याला नाशिककर भुलले आणि आम्ही सत्तेत असताना केलेली कामं विसरले. दत्तक घेणारे फडणवीस नंतर पुन्हा नाशिकमध्ये फिरकलेच नाहीत, अशी टीका राज ठाकरे यांनी केली.

आणखी वाचा

राज ठाकरेंनी सांगितला मुंबईचा चेहरामोहरा बदलण्याचा भविष्यातील धडकी भरवणारा प्लॅन