मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra modi) दोन दिवसांपूर्वी भारतीयांना आवाहन करत काही महत्त्वाच्या वस्तूंसाठी काटकसर करण्याचं आवाहन केलं. सोनं खरेदी कमी करा, परदेशात जाऊ नका, पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा, विजेवर चालणाऱ्या गाड्या जास्त वापरा, वर्कफ्रॉम होमचा पर्याय स्वीकारा अशा गोष्टीचं मोदींनी आवाहन केलं असून, पंतप्रधानांच्या आवाहनावरुन देशभरात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधकांकडून जोरदार टीकाही केली जात आहे. आता, मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीही मोदींच्या आवाहनावर खरमरीत पत्र लिहून विविध मुद्दे मांडले आहेत. तसेच, आपली मन की बात बंद करुन आता देशातील अर्थतज्ज्ञांची मन की बात ऐकावी, असेही सूचवले आहे. त्यावरुन, आता महायुतीच्या (Nitesh Rane) नेत्यांनी राज ठाकरेंवर पलटवार केला आहे.  

Continues below advertisement

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भूमिका मांडल्यानंतर आता त्यांच्या भूमिकेवर सत्ताधारी पक्षातील नेते प्रतिक्रिया देत पलटवार करत आहेत. महायुतीमधील मंत्री नितेश राणे आणि मंत्री योगेश कदम यांनी राज ठाकरेंच्या भूमिकेवर प्रतिक्रिया देत टीका केली. तर, शिवसेना नेते रामदास कदम यांनीही राज ठाकरेंच्या भूमिकेवरुन पलटवार केला आहे. 

त्यावर राज ठाकरेंची भूमिका काय?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून पुढील वर्षभर आम्ही सोने खरेदी करणार नाही, असे मंत्री योगेश कदम यांनी म्हटलं. तसेच, राज ठाकरेंच्या भूमिकेवरही त्यांनी सवाल उपस्थित केला आहे. सगळी बाजू समजून घेऊन भूमिका मांडणे गरजेचे आहे, सगळ्या बाजू समजून न घेता टीका करणे अयोग्य. जागतिक स्थिती पाहून आपण पुढची तयारी केली पाहिजे, असे योगेश कदम यांनी म्हटलं. कोणतेही जागतिक युद्ध सुरू नसताना देखील तत्कालीन सरकारने सोनं खरेदी न करण्याचे आवाहन केले होते. मग, त्यावर राज ठाकरे यांची काय भूमिका? असा सवालही योगेश कदम यांनी राज ठाकरेंना विचारला आहे. पंतप्रधान यांनी आवाहन केल्यावर देश आर्थिक संकटात असल्याचा अंदाज लावणे चुकीचे आहे. भारत सोडून इतर देशात सध्या इंधन तुटवडा आहे, त्यांच्या तुलनेत आपली परिस्थिती अतिशय चांगली असल्याचंही कदम यांनी म्हटलं. 

Continues below advertisement

झोपेचं सोंग घेतलं असेल तर..

राज ठाकरेंच्या भूमिकेवर बोलताना रामदास कदम म्हणाले की, एखाद्या झोपलेल्या माणसाला जागा करता येते, आता राज  ठाकरेंनी झोपलेले असलेल्याचं सोंग घेतलं असेल, तर त्यांना जागा करता येणार नाही, अशी खोचक प्रतिक्रिया रामदास कदम यांनी दिली. भविष्यात एखादी गोष्ट होणार असेल तर उद्या अडचण होण्यापेक्षा आज आपण काटकसर प्रमाणे वागलं पाहिजे, असेही ते म्हणाले. 

घरात बसू अर्थतज्ज्ञांचा सल्ला समजत नसेल - नितेश राणे

मंत्री नितेश राणे यांनीही राज ठाकरेंच्या पत्रावर प्रतिक्रिया दिली असून कदाचित घरात बसून अर्थतज्ज्ञांचा सल्ला समजत नसेल आणि म्हणून देशात ज्या नरेंद्र मोदीनी गुजरातचं मुख्यमंत्री म्हणून नेतृत्व केलं, देशाचं नेतृत्व वारंवार करतायत, देशाचे नागरिक त्यांना तीनदा पंतप्रधान होण्याची संधी दिलेली आहे, त्या व्यक्तीला काय सल्ला द्यायचे हे राज ठाकरेंना माहिती असलं पाहिजे, असा खोचक टोला नितेश राणेंनी लगावला. आपल्या देशाला पुढे घेऊन जायचं असेल, तर देशाची 'मन की बात' त्यांना कळते, नागरिकांची 'मन की बात' कळते, म्हणूनच तर तीनदा निवडून दिलेलं आहे. त्याच्यामध्ये उद्योजक पण आले, त्याच्यामध्ये अर्थतज्ज्ञ पण आले. आपल्या देशाच्या विकासाचा दर राज ठाकरेंना माहिती आहे का? आज आपला देश आर्थिक सत्तेमध्ये तिसऱ्या क्रमांकावर पोहोचलेला आहे. तो कुठे होता आणि कुठे आहे? जगात होणारी युद्धाची परिस्थिती आणि आज आपण लग्न समारंभ करतोय, कार्यक्रम घेतोय, दुसरीकडे श्वास घेण्यासाठी पण संधी भेटत नाही. तर, चांगल्याला चांगलं म्हणावं, हा माणुसकीचा धर्म म्हणतो, असेही नितेश राणेंनी म्हटलं. 

हेही वाचा

मोठी बातमी! NEET पेपरफुटीत नाशिकमधून 30 वर्षीय युवकास अटक, हेअरस्टाईल बदलून फिरायचा; सीबीआय ॲक्शन मोडवर