Raj Thackeray on PM Narendra Modi: भारतीय अर्थव्यवस्थेने चालू आर्थिक वर्षातील एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत तब्बल 7.8 टक्के इतका विकास दर (GDP growth rate) नोंदवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी काही दिवसांपूर्वी देशवासियांचे आभार मानले होते. पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत देशवासियांशी संवाद साधताना महत्त्वाचे आवाहन केले होते. देशाचा आर्थिक विकासदर चांगला असून ही गती कायम ठेवायची असेल तर आपल्याला स्वदेशी आणि आत्मनिर्भर भारत या दोन धोरणांचा अधिकाअधिक अवलंब करावा लागेल, त्यासाठी परदेशातील प्रवास टाळा, विदेशात जाऊन लग्नसोहळे करणे टाळा आणि गरज नसेल तर सोने (Gold) खरेदी करू नका, असा सल्ला त्यांनी दिला होता. आता पंतप्रधान मोदींच्या याच आवाहनावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

Continues below advertisement

राज ठाकरे म्हणाले की, “दोन दिवसांपूर्वी नरेंद्र मोदींनी परदेशात असताना सांगितले की, कोणीही परदेशात जाऊ नका. मला ही गोष्टच फार आवडली की, परदेशातून भारतीयांना सांगायचे परदेशात जाऊ नका. सोने खरेदी करू नका आणि भारतात सांगितले जात आहे की, आमचा देशाचा जीडीपी 7.8 टक्के आहे. जो अमेरिका आणि चीनपेक्षा देखील जास्त आहे. मग परदेशात का जायचे नाही? मग सोने का खरेदी करायचे नाही? घरामध्ये जेव्हा चणचण असते, तेव्हाच काटकसर सुरू होते ना. 7.8 टक्के आपला जीडीपी ग्रोथ आहे, मग या देशातल्या लोकांनी परदेशात का फिरायला जायचे नाही? त्यांनी का सोने खरेदी करायचे नाही? याचे कारण संपूर्ण देशाची आर्थिक परिस्थिती ही ढासळलेली आहे. पुढे पुढे आर्थिकदृष्ट्या काय काय गोष्टी घडतील. आता फक्त नीटच्या प्रकरणात जेन झी तरुण रस्त्यावरत आलेत, उद्या अख्खा देश रस्त्यावरती येईल. आपण गांभीर्याने विचार करण्याची गोष्ट आहे की, आपण नक्की चाललोय कुठे आणि आपण काय करतोय?,” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Raj Thackeray on PM Narendra Modi: 503 कंपन्यांनी कामकाज बंद केले

राज ठाकरे पुढे म्हणाले की, “तुम्हाला या सगळ्या गोष्टीत फक्त गुंतवून ठेवायचे आहे. जातीच्या वादात, धर्माच्या वादात गुंतवून ठेवायचे, तुम्ही या वादात गुंतून राहिलेत की बाकीचे प्रश्न विचारायला तुम्ही मोकळे नसतात. देशात सर्वाधिक बेरोजगारीचे प्रमाण आज वाढलेले आहे. इतकी भयानक परिस्थिती आता देशामध्ये आहे. हे आता सरकारचे किंवा भारतीय जनता पक्षाचे आंधळेपणाने फॉलो करणारे लोक आहेत, त्यांच्यावर जाऊ नका. कारण ते आता बोलत आहे ते स्वतःची समजूत काढत आहेत. ते बाकी दुसरं काही करत नाही. त्यांना वस्तुस्थिती आणि परिस्थिती माहितीच नाही. त्यांना जे वरतून व्हॉट्सअॅप पाठवले जातात, ते वाचतात, पाठ करतात आणि तुमच्याशी बोलायला लागतात,” असे त्यांनी म्हटले. 2021 ते 26 मध्ये ज्या परदेशी कंपन्या भारतात आल्या, त्यातील 503 कंपन्यांनी कामकाज बंद केले आहे म्हणजे नोकऱ्या किती गेल्या याचा अंदाज बांधा. हा डेटा मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेरचा डेटा आहे. व्हॉट्सअॅपवर आलेला नाही, असे देखील राज ठाकरे यांनी म्हटले.

Continues below advertisement

आणखी वाचा 

Raj Thackeray: पुण्यात अमित ठाकरेंनी पंतप्रधानांचा फोटो हटवला; आता राज ठाकरे इशारा देत म्हणाले, 'आत्ताच सुधारून घ्या...'