Raj Rajapurkar : मराठा-ओबीसी, हिंदू-मुस्लिम वाद वाढला पाहिजे ही भारतीय जनता पक्षाची भूमिका आहे. तुम्ही गांधींना मारलं, तुकारामांना मारलं, आता तुम्हाला जरांगे यांना मारायचा आहे का? असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या ओबीसी सेलचे प्रमुख राज राजापूरकर (Raj Rajapurkar) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांनी सर्वांचा मुख्यमंत्री व्हावं, फक्त भाजपचा मुख्यमंत्री होऊ नये. समाजाला तोडायचं, दंगली घडवायचं काम आता व्हायला नको पाहिजे.

Continues below advertisement


दरम्यान, मनोज जरांगे आझाद मैदानात उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या तब्येतीच्या चौकशीसाठी आपण त्यांची भेट घेतल्याचं राजापूरकर यांनी सांगितलं. राज राजापूरकर यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची राज्यभरात मंडल यात्रा सुरु आहे. अशातच त्यांच्या या टीकेने आणि मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला दिलेल्या उघड पाठिंब्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे.


नेमकं काय म्हणाले राज राजापूरकर?


'मी देशाचा नागरिक आहे. म्हणून मनोज जरांगे यांच्या तब्येतीची विचारपुस करायला, भेटायला गेलो होतो, मात्र याचा चुकीचा अर्थ घेत ओबीसी मराठ्यांच्या भेटीला, असे वाद लावले जात आहेत. भाजपला हेच पाहिजे आहे. हिंदू-मुस्लिम ओबीसी-मराठा वाद लावणं. मराठा समाजाला आरक्षण मिळालच पाहिजे. सरकारने यावर निर्णय घ्यायचा आहे. मुख्यमंत्र्यांनी हातात बांगड्या तर भरल्या नाहीत ना. एकनाथ शिंदे गावाला निघून गेले की लगेच हे मोदीना भेटायला जातात, शिंदे नाराज झाले त्याला मी काय करू? अजित पवार नाराज झाले की मोदीकडे जातात आणि विचारतात काय करू? आता मराठा समाज नाराज आहे. आंदोलन करत आहे. मग यांची अडचण सोडवा. तुम्ही गांधींना मारलं, आता जरांगेना मारणार आहात का? काय चाललय महाराष्ट्रात? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर यांनी केला आहे.


जरांगे यांची मागणी म्हणजे राज राजापूरकर यांची मागणी समजायची का? - बबनराव तायवाडे


दरम्यान, राज राजापुरकर यांच्या भूमिकेचा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी निषेध केला. मनोज जरांगे यांची मागणी म्हणजे राज राजापूरकर यांची मागणी समजायची का? असा सवाल तायवाडे यांनी उपस्थित केला. तर काँग्रेस आमदार अभिजीत वंजारी यांनी काँग्रेसच्या वतीने सावध भूमिका घेत हा त्यांच्या पक्षाचा व नेत्याचा वैक्तिक निर्णय असल्याचे सांगितले. शरद पवार यांनी मराठा आरक्षणासंदर्भात काल केलेल्या सूचनेचे राष्ट्रीय ओबीसी महासंघ व काँग्रेस यांनी समर्थन केले आहे.


आणखी वाचा