Rahuri byelection: भाजप नेते शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राहुरी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी येत्या 23 एप्रिलला मतदान होणार आहे. तर 4 मे रोजी या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होईल. राहुरी विधानसभा मतदारसंघात (Rahuri Bypoll 2026) भाजपने दिवंगत नेते शिवाजीराव कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले (Akshay Kardile) यांना उमेदवारी दिली आहे. तर शरद पवार गटाकडून प्राजक्त तनपुरे (Prajakta Tanpure) हे निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती. मात्र, आज सकाळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी भेट घेतल्यानंतर प्राजक्त तनपुरे उमेदवारी अर्ज भरणार की नाही, याबाबत शंका निर्माण झाली होती. (Maharashtra Politics news)

राहुरी विधानसभा पोटनिवडणूक संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची नेमकी भूमिका अद्याप ठरलेली नाही. दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे. तोपर्यंत शरद पवार गटाने वेट अँड वॉचची भूमिका घेतली जाईल, असे दिसत आहे. शरद पवार गटाच्या मुंबईतील कार्यालयातून पक्षाने दोन एबी फॉर्म पाठवले आहेत. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून गोविंद मोकाटे आणि प्राजक्त तनपुरे यांच्यासाठी दोन एबी फॉर्म पाठवण्यात आले आहेत. मात्र, अजूनही कोणीही अर्ज भरलेला नाही. तीन वाजेपर्यंत अर्ज भरण्याची मुदत असून शेवटच्या क्षणी कोण अर्ज दाखल करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भेटीनंतर प्राजक्त तनपुरे नेमकी काय निर्णय घेतात याकडे शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. 

राहुरीच्या पोटनिवडणुकीत भाजपने अक्षय कर्डिले यांच्या पाठीशी सर्व ताकद उभी केली तरी ते राजकारणात तुलनेने नवखे आहेत. याउलट जयंत पाटील यांचे भाचे असलेले प्राजक्त तनपुरे यांच्या गाठिशी राजकारणाचा दीर्घ अनुभव आहे. त्यांनी मविआ सरकारच्या काळात राज्यमंत्री म्हणून काम केले आहे. राहुरी मतदारसंघाच्या पट्ट्यात सहकारी संस्थांचे मोठे जाळे आहे. सहकाराच्या क्षेत्रावर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्षानुवर्षे वर्चस्व राहिले आहे. याशिवाय, प्राजक्त तनपुरे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यास जयंत पाटील आणि शरद पवार गट अधिक सक्रिय होऊन काम करेल. त्यामुळे भाजपचे  पाठबळ असूनही अक्षय कर्डिले यांचा राहुरी पोटनिवडणुकीतील विजय निश्चित म्हणता येणार नाही. त्यामुळेच सोमवारी सकाळी रवींद्र चव्हाण आणि राधाकृष्ण विखे-पाटील यांनी प्राजक्त तनपुरे यांच्याशी बंद दाराआड चर्चा केली. यावेळी दोन्ही नेत्यांनी आगामी काळात राहुरीत पाहिजे त्या विकास कामांसाठी सहकार्य करण्याच्या मोबदल्यात पोटनिवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्याची विनंती केली. रवींद्र चव्हाण यांनी प्राजक्त तनपुरे यांचे फोनवरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही बोलणे करुन दिले. यानंतर प्राजक्त तनपुरे यांनी आपण आपल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करुन पुढील निर्णय घेऊ, असे सांगितले होते. त्यामुळे आता प्राजक्त तनपुरे आणि गोविंद मोकाटे यांच्यापैकी कोणी उमेदवारी अर्ज भरणार की राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार, हे येत्या काही तासांमध्ये स्पष्ट होईल.

आणखी वाचा

राहुरीत भाजपने शेवटच्या क्षणी डाव टाकलाच, विखे-पाटील, चव्हाणांची तनपुरेंशी चर्चा, थेट फडणवीसांनाच फोन लावून दिला अन्...