Rahul Gandhi: सध्या आमची उत्तराखंड संदर्भात कोणतीही प्लॅनिंग नाही, पण आम्ही निर्णय घेतला आहे की आमचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना न्याय मिळालाच पाहिजे. आता चेंडू त्यांच्या कोर्टात आहे. जर त्यांनी कारवाई केली तर उत्तम; पण जर कारवाई झाली नाही, तर आमची नक्कीच प्रतिक्रिया येईल. आजकाल प्रत्येक कृतीला (action) त्याहून मोठी प्रतिक्रिया (reaction) मिळते, अशा शब्दात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सूचक इशारा दिला आहे.
अस्पृश्यता संविधानानुसार गुन्हा
राहुल गांधी म्हणाले की, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य देशासाठी आणि संविधानासाठी दिले आहे, ते हलद्वानी येथे भाषण द्यायला गेले होतेआणि त्यांच्या सभेनंतर तिथे 'शुद्धीकरण' केले गेले. 8 ऑगस्टला खरगेजींची रॅली होते आणि 10 ऑगस्टला भाजप-आरएसएसचे कार्यकर्ते तिथे जाऊन शुद्धीकरण करतात. हा संविधानानुसार एक गुन्हा आहे. शुद्धीकरण अस्पृश्यतेचे दुसरे नाव आहे. संविधानाने अस्पृश्यता बेकायदेशीर ठरवली असतानाही हे लोक जाहीरपणे त्याचे आचरण करत आहेत. 'शुद्धीकरण' करून ते संदेश देत आहेत की दलित घाणेरडे आहेत, त्यांना स्पर्श करू नये. हा संविधानानुसार गंभीर गुन्हा आहे.
पंतप्रधानांनी स्वतः याचे आदेश द्यावेत
त्यांनी सांगितले की, पंतप्रधान म्हणतात की ते प्रत्येक जातीचे आहेत आणि संपूर्ण भारताचे पंतप्रधान आहेत. पण त्यांच्याच पक्षाचे उत्तराखंडचे नेते उघडपणे म्हणतात की शुद्धीकरण करण्यात काहीच गैर नाही. 'शुद्धीकरण करणे हा गुन्हा आहे' आणि यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. आमची मागणी आहे की ज्यांनी उत्तराखंडमध्ये हे शुद्धीकरण केले आहे, त्यांच्यावर एससी/एसटी कायद्यांतर्गत तत्काळ एफआयआर (FIR) नोंदवला जावा आणि पंतप्रधानांनी स्वतः याचे आदेश द्यावेत. ही घटना भाजप आणि आरएसएसची मानसिकता दर्शवते. त्यांना या देशातील दलितांची प्रगती नको आहे, दलितांनी सन्मानाने आणि यशस्वीपणे जगावे असे त्यांना वाटत नाही.
तर चार वर्षांच्या दलित मुलासोबत काय घडत असेल
हा केवळ खरगेजींचा वैयक्तिक प्रश्न नाही. हा भारतातील लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येक दलित व्यक्तीचा प्रश्न आहे. खरगेजी आपले अध्यक्ष आहेत म्हणून आपण हा प्रश्न उपस्थित करत आहोत, पण प्रत्यक्षात हा प्रत्येक दलित बांधवाचा आणि महिलेचा प्रश्न आहे. हे आम्हाला अजिबात मान्य नाही. हे तर केवळ हिमनगाचे टोक आहे. जर आपल्या पक्षाच्या अध्यक्षांसारख्या एवढ्या ज्येष्ठ व्यक्तीसोबत उघडपणे आणि बिनदिक्कतपणे असे केले जाऊ शकते, तर विचार करा शाळेतील एका चार वर्षांच्या दलित मुलासोबत काय घडत असेल, असे त्यांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या
