नाशिक : काँग्रेस नेते तथा लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या पुण्यातील कार्यक्रमात एका आदिवासी (Trible) विद्यार्थीनीने आपल्या मुद्द्यांकडे आणि आदिवासी विद्यार्थीनींच्या वसतीगृहाकडे त्यांचे लक्ष वेधले होते. त्यानंतर, राहुल गांधींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून, दुर्गम भागातील गाव खेड्यातून आलेले विद्यार्थी दान मागत नाहीयेत, ते त्यांचा अधिकार मागत आहेत. तुम्ही त्यांना व्यक्तिगतरित्या भेटून त्यांच्या समस्या तात्काळ सोडवाल, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. आता, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan sapkal) यांनी नाशिकमधील (Nashik) आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणाला भेट देत आदिवासी मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
नाशिकमधील आदिवासी आंदोलकांची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी भेट घेतली, गेल्या तीन दिवसांपासून आदिवासी विद्यार्थ्यांचे हे आंदोलन सुरू असून तीन विद्यार्थी उपोषणाला बसेल आहेत. यावेळी, आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची हर्षवर्धन सपकाळ यांनी भेट घेतली, विद्यार्थीच्या प्रश्नांवर आवाज उठवण्याचं आश्वासन त्यांनी यावेळी उपोषणकर्त्यांना दिलं. गडचिरोली आश्रमशाळेत सर्पदंशने मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, सेंट्रल किचन योजना बंद करावी, आदिवासी विद्यार्थ्यांना सोयीसुविधा द्याव्यात यासह विविध मागण्यांसाठी केले जात आहे.
आंदोलकांच्या मागण्याबाबत हर्षवर्धन सपकाळांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. सर्पदंशाने मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांना 1 कोटी रुपये मदत मिळावी, 5 ऑगस्ट 2026 रोजीचा सुधारित जीआर रद्द करावा अशी आंदोलकांची मागणी आहे. आदिवासींच्या आंदोलनाला राहुल गांधींनी या आधीच पाठिंबा दिला आहे, एक विद्यार्थीनी राहुल गांधी यांना भेटली ते अख्ख्या जगाने बघितलं आहे. दोन वर्षांत 584 विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय, आदिवासी विभागात गलथान कारभार सुरू आहे, याला जबाबदार असणाऱ्या आदिवासी मंत्री अशोक उईके यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. तसेच, याविषयी स्वतंत्र कॅबिनेट घेतली पाहिजे ही आमची भूमिका आहे, असेही सपकाळ यांनी म्हटलं.
मोदींकडून ठराविक व्यापाऱ्यांचं चांगभलं
मोदी सरकारच्या 12 वर्षात साखरही कडू झाली आहे, साखरेचे दर 50 वरून 100 वर गेले आहेत. पेट्रोल-डिझेल 100 वर गेले, गॅस सिलेंडरचे दर 400 वर गेले आहेत. देशात होणारा भ्रष्टाचार कारणीभूत आहे. मोदी आपल्या काही ठराविक व्यापाऱ्यांचे चागभलं व्हावे यासाठी धोरण ठरवतात त्याचे हे परिपाक असल्याची टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
