Pune Zilla Parishad and Panchayat Election 2026: पुण्यातील मावळ तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकीत ही महायुती तुटणार, हे जवळपास निश्चित मानलं जातंय. अजित पवारांचे आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) आणि भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे (Bala Bhegade) या मामा-भाच्यांमध्ये पुन्हा एकदा जुंपलेली आहे. बाळा भेगडेंना भाजपमध्ये कोण विचारतं? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसमोर कोणाला किती किंमत दिली जाते? भाजपच्या वरिष्ठांकडून युतीबाबत मला का विचारणा होते? असं म्हणत शेळकेंनी भेगडेंची खिल्ली उडवली.

Continues below advertisement

दरम्यान, भेगडेंनी युतीचा कोणताही प्रस्ताव आला नाही, असं वक्तव्य करत शेळकेंना खोटं पाडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर भेगडेंनी हे धंदे बंद करावेत, असं शेळकेंनी सुनावलं. मात्र या खडाजंगीनं मावळात झेडपी निवडणुकीत महायुती तुटणार हे उघड आहे.

सुनील शेळकेंना धक्का, राष्ट्रवादी उपाध्यक्ष भाजपात. झेडपी-पंचायत समिती निवडणुकांच्या डावपेचांना वेग

Continues below advertisement

पुण्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या डावपेचांना वेग आलाय. मावळ तालुक्यात भाजपने पहिला धक्का अजित पवारांना दिलाय. आमदार सुनील शेळकेंचे खंदे समर्थक आणि उपाध्यक्ष प्रशांत भागवत थेट भाजपमध्ये दाखल झालेत. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत प्रशांत भागवत यांनी पत्नी मेघा भागवतांसोबत कमळ हाती घेतलंय. जिल्हा परिषद इंदोरी-वराळे गटात यानिमित्ताने खळबळ उडाली आहे. काँग्रेसमधून आलेल्या ‘आयात’ उमेदवाराला उमेदवारी देण्याचा घाट घातला जाणार आणि मेघा भागवत यांना डावलले जाणार. ही शंका गृहीत धरून भागवत दाम्पत्यांनी राष्ट्रवादीची साथ सोडली. प्रवेशाच्या काहीवेळ आधी सुनील शेळकेंना याबाबाबत विचारलं तेंव्हा प्रशांत आज ही आमच्या सोबत आहे, असा दावा केला होता. त्यामुळं शेळकेंना हा धक्का मानला जातोय.

Sunil Shelke : सुनील शेळके नेमंक काय म्हणाले? 

प्रशांत भागवत यांनी राजीनामा दिलेला आहे ते तुमचे निष्ठावंत होते याबाबत बोलताना सुनील शेळके म्हणाले, माझ्याकडे कोणताही राजीनामा आलेला नाही, तुमच्याकडे राजीनामा आला असेल पण माझ्याकडे पोहोचलेला नाही, प्रशांत भागवत कालही आमच्याबरोबर होता. आजही दुपारपर्यंत माझ्याबरोबर होता, संध्याकाळी त्याला सांगितलं होतं की आपल्याला काही निर्णय घ्यायचे आहेत, परंतु त्यांनी ब्राह्मण वाडीत घर बांधलेलं आहे. त्या घराचा कार्यक्रम होता. म्हणून मी तिकडे जाऊन येतो असं त्यांनी मला सांगितलं, तो अद्याप इकडे आलेला नाही. मात्र, आम्हाला राजीनामा बद्दल काही माहिती नाही, असं सुनील शेळके यांनी म्हटलं आहे.