पुणे : राज्यातील विधानपरिषदेच्या (Vidhanparishad) पाचही जागांसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे. त्या पार्श्वभूमीवर बंडखोर आणि अपक्ष उमेदवारांचे अर्ज माघारी घेतले जात आहेत. महायुतीमध्ये पुणे शिक्षक मतदारसंघातून शिवसेनेच्या मंगेश चिवटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महायुतीत मोठी अडचण निर्माण झाली होती. तर, पुणे पदवीरधरमधून राष्ट्रवादीच्या प्रताप भैय्या माने यांच्या उमेदवारीमुळे भाजपची अडचण झाली होती. अखेर महायुतीमधील (Mahayuti) दोन्ही उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेतला आहे. त्यानंतर, मंगेश चिवटेंनी (Mangesh chivate) माध्यमांशी बोलताना पहिली प्रतिक्रिया दिली.
भाजपने पुणे शिक्षक मतदारसंघातुन कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, शिवसेनेकडून मंगेश चिवटे यांनी देखील अर्ज दाखल केलाय. तर पदवीधर मतदारसंघातून भाजपने स्मिता जाधव यांना उमेदवारी दिलीय मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या भैय्या माने यांनी बंडखोरी केली होती. अखेर, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी भैय्या मानेंची समजूत काढल्यानंतर त्यांनी आपला अर्ज माघारी घेतला. तर, वरिष्ठांच्या आदेशानंतर मंगेश चिवटे यांनीही आपली उमेदवारी मागे घेतली आहे. त्यानंतर, माध्यमांशी बोलताना त्यांनी थोडक्यात प्रतिक्रिया दिली.
मंगेश चिवटे यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यानंतर माध्यमांनी त्यांना यासंदर्भात प्रश्न विचारला होता. त्यावर, पक्षाचे वरिष्ठ नेते यावर भाष्य करतील, मी लहान कार्यकर्ता आहे अशी प्रतिक्रिया मंगेश चिवटे यांनी दिली. त्यामुळे, शिवसेना पक्षाचे अधिकृत प्रवक्ते किंवा उपमुख्यमंत्री तथा मुख्य नेते एकनाथ शिंदे काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या भैय्या मानेंची प्रतिक्रिया
नेमकं कारण काय माघार घेण्याचं? शक्ती प्रदर्शन कार्यकर्त्यांची भावना होती, जिवंतपणा जो कार्यकर्ता असतो, त्याच्यातून ते शक्ती प्रदर्शन झालेलं होतं, दबाव काही नाही, पण महायुती म्हणून मला काल हसन मुश्रीफ भेटले, जनस्वराज्याचे विनय कोरे, सुमित कदम त्यांनी विनंती केली की या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण अपक्ष निवडणूक लढवून आपण महायुतीत थोडासा गोंधळ आणि त्यामुळे आपण माघार घ्यावी आणि त्यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत मी मागे घेतलं आहे. मी माघार घेतल्याने नक्कीच महायुतीला फायदा होईल, मला आश्वासन वगैरे काही दिलेलं नाही.
दरम्यान, पुणे शिक्षक मतदारसंघातून माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे, आता महायुती विरुद्ध, महाविकास आघाडी विरुद्ध अपक्ष असा सामना पाहायला मिळू शकतो. दरम्यान, सचिन सानप यांच्या भूमिकेकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
